

पैंगीण : गोव्याच्या आदिवासी व लोकसंस्कृतीचा जागर घडवणाऱ्या रौप्यमहोत्सवी ‘आदी लोकोत्सव25’ साठी आदर्शग्राम आमोणेपैंगीण येथे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. लोककला, निसर्ग, क्रीडा, साहस आणि लोकसहभाग यांचा समन्वय साधणारा हा लोकोत्सव यंदा भव्य व बहुआयामी स्वरूपात साजरा होणार आहे.
आदर्श युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व आयोजन समितीचे अध्यक्ष तसेच कला व संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून हा लोकोत्सव साकार होत असून, आदर्श युवा संघ, श्री बलराम शिक्षण संस्था तसेच कला व संस्कृती संचालनालय व आदिवासी संशोधन संस्था, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.
लोकोत्सव स्थळी पर्यावरणपूरक सजावट, वारली व आदिवासी शैलीतील चित्रकला, ग्रामीण संकल्पनेनुसार उभारलेली रचना लक्ष वेधून घेत आहे. आदिवासी नृत्य, लोककला, पारंपरिक वाद्ये, साहसी खेळ, तालुकास्तरीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेमुळे लोकोत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन व सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. स्वयंसेवक, युवक, स्थानिक कलाकार व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हा या लोकोत्सवाचा प्रमुख आधार ठरत असून, नव्या पिढीला लोकसंस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.