

पणजी/वाळपई : राज्यात बेकायदा पद्धतीने गोमांस वाहतुकीचा प्रकार उघड झाला आहे. तब्बल बाराशे किलो गोमांस दोन घटनांत जप्त करण्यात आले आहे. पहिल्या घटनेत कर्नाटक-गोवा सीमेवरील मोले तपासणी नाक्याजवळ एका चारचाकी वाहनात 3 लाख 32 हजार रुपये किमतीचे 800 किलो निकृष्ट गोमांस कुळे पोलिसांनी जप्त केले. दुसर्या घटनेत बेळगावहून गोव्याच्या दिशेने होणारी बेकायदेशीर गोमांस वाहतूक वाळपई पोलिसांनी हाणून पाडली. केरी तपासणी नाक्यावर पोलिसांनी सुमारे 400 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त केले. रविवारी पहाटे सुमारे 4 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बजरंग दल आणि गोप्रेमींनी बेळगावहून गोमांस वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी केरी चेकपोस्टवर पाळत ठेवली होती.
कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळी येथून मडगाव येथील बाजारपेठेत बेकायदा पद्धतीने मोठ्या प्रमाणात हे गोमांस आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, कुळे पोलिसांनी मोले भागात सापळा रचला. त्यानुसार, जीए-08-एबी-4479 कारमधून हा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. डॉ. केतन चौगुले यांनी मांसाची तपासणी केली असता ते खाण्यायोग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. गोप्रेमींना केरी तपासणी नाक्यावर कारमधून गोमांस आणले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, चिन्मय गाडगीळ व गणपतराव देसाई या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून ही कार थांबवण्यासाठी रात्री उशिरा तपासणी नाक्यावर पाळत ठेवली. कार आल्यानंतर पोलिसांच्या मदतीने ती अडवण्यात आली. मात्र या कारमधील तिघांपैकी दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले.
गोप्रेमींनी कार (केए 25 बी 6719) अडवल्यानंतर दोघे पळून गेलेे. पोलिसांनी कारमधील सोहील मुबारक बेपारी (27 वर्षे, रा. बेळगाव) याला वाहनासह ताब्यात घेतले आहे. बेपारी याच्याविरुद्ध पोलिसांनी बेकायदा गोमांस वाहतूक प्रकरणी कलम 325 नुसार गुन्हा नोंदवला आहे.
केरी तपासणी नाक्यावर यापूर्वीही मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त करण्यात आले आहे. पोलिसांकडून व संबंधित खात्याच्या अधिकार्यांकडून ही कारवाई केली जाते. मात्र तरीसुद्धा बेळगावमधून गोव्यात होणारी गोमांसाची तस्करी थांबलेली नाही. यामुळे आता सरकारने या तपासणी नाक्यावर कडक पहारा ठेवावा, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.