संकेश्वर, बेळगाव : मासेमारी करून जगणारे बेनकोळी (ता. हुक्केरी) येथील वडील व त्यांची दोन अल्पवयीन मुले असे तिघे जण घटप्रभा नदीत बुडाले असून, दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. तर वडिलांचा शोध सुरू आहे. मासे पकडण्यासाठी गेले असताना रविवारी रात्री त्यांची नौका नदीत बुडाली. नौकेत पाणी शिरून तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
लक्ष्मण रामा आमले (वय 45) आणि त्यांची दोन मुले रमेश (वय 15) व यल्लाप्पा (वय 13, सर्वजण रा. बेनकोळी, ता. हुक्केरी) यांचा बुडालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमले कुटुंबीय मासेमारी करून गुजराण करते. वेळ मिळेल तेव्हा ते मासेमारीसाठी जात असत. रविवारी रात्री लक्ष्मण आपल्या दोन अल्पवयीन मुलांना घेऊन घटप्रभा नदीत मासेमारीसाठी गेले होते. परंतु, दुसरा दिवस उजाडला तरी ते परतले नाहीत. सध्या बेनकोळीची यात्रा सुरू असल्याने यात्रेत कुठेतरी थांबले असतील, असा समज करून घेत पत्नीनेही शोधाशोध केली नाही. परंतु, दुसर्या दिवशी सकाळचे आठ वाजले तरी आले नसल्याने महिलेने यमकनमर्डी पोलिसांत जाऊन फिर्याद दिली.
यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवत स्वतःही पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना नदीच्या मधोमध मासेमारीसाठी लावलेली जाळी व पाण्याने भरलेली बोट दिसली. तेव्हा तिघेही बुडाल्याचा संशय आला. त्यानंतर अग्नीशामक जवानांनी शोधमोहीम सुरू केली असता सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रमेश व यल्लाप्पा या दोघांचे मृतदेह सापडले. परंतु, वडिलांच्या मृतदेहाचा उशिरापर्यंत शोध सुरू होता. रात्र झाल्याने मोहीम थांबवण्यात आली. उद्या सकाळी पुन्हा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही मुले वडिलांसोबत नेहमीच मासेमारीसाठी जात होती. नदीच्या मधोमध गेल्यानंतर बहुदा बोटीत पाणी शिरले असावे. त्यामुळे तिघेही बुडाले. लक्ष्मण यांना पोहता येत होते. परंतु, दोन्ही मुलांना पोहता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुलांना वाचवताना वडीलही बुडाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.