गोवा : मुलीला आंदोलनस्थळी पाहून अमित पालेकर भावुक | पुढारी

गोवा : मुलीला आंदोलनस्थळी पाहून अमित पालेकर भावुक

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  जुने गोवे येथील बेकायदा बांधकामाविरुद्ध उपोषणाला बसलेले आप नेते अमित पालेकर मंगळवारी भावुक झाले. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी त्यांची पत्नी आणि लहान मुलीने त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबाव्यतिरिक्त अनेक गोवेकरांनीही त्यांची भेट घेतली. या प्रश्नी अंतिम निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जुने गोवा वारसा स्थळी बेकायदेशीर बांधकामाच्या मालकाला जुने गोवा पंचायतीने काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. अ‍ॅड. अमित पालेकर यांनी पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यावर ते म्हणाले की, नगर नियोजन खाते बेकायदेशीर बांधकामांना दिलेली परवानगी रद्द करत नाही, तोपर्यंत आपण आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवणार आहे. अनेक आमदारांनी आंदोलकांना पाठिंबा देऊनही सरकारने बेकायदा बांधकामांवर कारवाई केलेली नाही. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्यानंतर पंचायतीने काम थांबवण्याचे आदेश जारी केले. मात्र, सरकार याप्रकरणी कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नगर नियोजन विभाग जोपर्यंत ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. एकदा विभागने रद्द करण्याची सूचना जारी केली की, किमान लोकांचा सरकारवर विश्वास निर्माण होईल. त्यानंतर आम्ही या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करू. बेकायदा बांधकामाला परवानगी देण्यात सर्व संबंधित अधिकारी गुंतले होते, असा आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या
Back to top button