Govind Gawde : मंत्री गोविंद गावडेंची अधिकाऱ्याला धमकी; ऑडिओ व्हायरल | पुढारी

Govind Gawde : मंत्री गोविंद गावडेंची अधिकाऱ्याला धमकी; ऑडिओ व्हायरल

पणजी; पुढारी वृत्तसेवा : कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे कला अकादमीच्या प्रश्नावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता त्यांचा आदिवासी (एसटी) कल्याण खात्याच्या व एसटी आयोगाच्या अधिकार्‍यांना धमकी तसेच शिवीगाळ केल्याचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधक यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. Govind Gawde

सभापती रमेश तवडकर यांच्या मतदारसंघातील खोतीगाव श्रीस्थळ पंचायतीमध्ये काही संस्थांना मंत्री गावडे यांनी तवडकर यांच्या परस्पर निधी दिला होता. या निधीवाटपात घोटाळा झाल्याचा आरोप पंचायतीच्या सरपंचांनी केला आहे. गावडे मनमानी करतात, असा आरोप तवडकर यांनीही केला होता. यावर निधीवाटपात कोणताही घोटाळा आपण केलेला नाही की मनमानी केलेली नाही, असे प्रत्युत्तर गावडे यांनी दिले होते. गावडे यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांकडून होत होती. Govind Gawde

दरम्यान, सोमवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पणजीतील बंगल्यावर गावडे व तवडकर यांना बोलावून घेण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही नेत्यांना सबुरीचा सल्ला देताना जाहीरपणे कुणीच काही बोलू नका, अशी तंबी दिली होती. त्यानंतर विधानसभेत विरोधकांनी गावडे यांच्यावर तवडकर यांनी केलेल्या आरोपावर विधानसभेत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, मुख्यमंत्री व सभापतींनी तो वाद संपला आहे, म्हणून विषय संपवला होता.

या वादावर पडदा पडत असताना गोविंद गावडे यांचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना गावडे हे दमदाटी करत असल्याचे ऐकू येत आहे. प्रियोळ मतदारसंघात फोंडा येथील एक सेवा संस्था आदिवासी आयोगाच्या सहकार्याने एक आदिवासी जागृती कार्यक्रम करणार होती. त्यावरून मंत्री गावडे हे रेडकर यांनी धमकावत आहेत. आपणास न विचारता कार्यक्रम आयोजित करू नका, केल्यास परिणाम वाईट होतील, मुख्यमंत्र्यांना व तवडकर यांनाही सांगा, आदिवासी आयोगाच्या अध्यक्षांना सांगा, कार्यालयात येऊन कापीन, असे गावडे बोलत आहेत. तर रेडकर हे त्यांना सर शिव्या देऊ नका, आपण आयोगाच्या अध्यक्षाशी बोलतो, असे म्हणत आहेत.

ऑडिओ सर्वत्र व्हायरल

गोविंद गावडे व दशरथ रेडकर यांच्यातील फोनवरील संभाषण रेकॉर्ड मुख्यमंत्री डॉ. सावंत व भाजपचे अध्यक्ष तानावडे यांच्याकडे अगोदरच पोहोचल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. विरोधक विधानसभेत या विषयावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

Back to top button