व्यवसाय परवाना दिलेली ‘ती’ इमारत धोकादायक, मडगाव महापालिकेला आपत्ती व्यवस्थापनाची नोटीस | पुढारी

व्यवसाय परवाना दिलेली 'ती' इमारत धोकादायक, मडगाव महापालिकेला आपत्ती व्यवस्थापनाची नोटीस

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : मडगाव नगरपालिकेचे एक एक भयंकर किस्से समोर येऊ लागले आहेत. एकीकडे मडगाव शहरात धोकादायक म्हणून ठरवण्यात आलेल्या इमारती एक एक करून कोसळुन पडत आहेत तिथे मडगाव पालिकेने अश्याच एका इमारतीत चक्क शोरूम उघडण्यासाठी व्यवसाय दाखला जारी करून अकलेचे तारे तोडले आहेत. नुकतेच त्या शोरूमचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. आता तीच धोकादायक इमारत पाडून टाकण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केल्याने पलिकेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

आता पर्यत मडगाव शहरात बऱ्याच जुन्या इमारती कोसळून पडल्या आहेत. इतर इमारती कोणत्याही क्षणी कोसळुन पडण्याच्या बेतात आहेत. लोकांचा जीव धोक्यात आला असला तरीही पालिकेला मात्र त्याचे कोणतेही सोयरे सुतक नाही. यावेळी तर कोसळुन पडण्याच्या बेतात असलेल्या बाप्तिस्ता रोड वरील इमारतीत शोरूमला परवानगी देऊन पालिकेन कहरच केला आहे. ती इमारत आता पाडून टाकण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापनाने दिले आहेत. नुकताच तसा आदेश पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. आमदार दिगंबर कामत यांनी उद्घाटन केलेल्या त्या शोरूमची इमारत पाडून टाकण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे. त्या शोरूमच्या उद्घाटनाला मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दमोदर शिरोडकर हे सुध्दा उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते सावियो कुटीनो यांनी या प्रकरावर संताप व्यक्त करतांना मडगाव पालिका मंडळासाठी ही शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी कामत यांच्या हातातील कटपुतली झालेले आहेत. यांच्या आदेशावर ते काहीही करण्यास तयार होतात हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. धोकादायक म्हणून नोटीस जारी केलेल्या त्या इमारतीत शोरूम सुरू करण्यासाठी व्यवसाय परवाना दिल्याबद्दल दक्षता खात्याकडून चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी सावियो यांनी केली आहे.

Back to top button