पणजी : प्रभाकर धुरी अभिनय म्हणजे वास्तविक जीवनातील भूमीकेची पुन्हा एकदा होणारी निर्मिती असते, असे मत प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केले. 54 व्या ' इफ्फी' अंतर्गत प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या मास्टरक्लासचे कला अकादमीमध्ये आयोजन केले होते. या सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी केले.
अभिनय कलेविषयी आपले विचार व्यक्त करताना त्रिपाठी म्हणाले की, हे संपूर्ण जग एक रंगभूमी आहे, आपण सर्वजण आपापल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. अभिनय म्हणजे वास्तविक जीवनातील भूमिकेची पुन्हा एकदा होणारी निर्मिती असते आणि त्यावेळी भावनांतून इतरांचे मनोरंजन केले जात असते.
प्रतिथयश, व्यावसायिक अभिनेता होण्यासाठी प्रत्येक गोष्टीविषयी मनामध्ये सह-अनुभूती वाटणे आवश्यक आहे, असे त्रिपाठी म्हणाले. अभिनय एक व्यापक उद्देश पूर्ण करतो. तसेच विविध दृष्टीकोन समजून घेऊन व्यक्तीला अभिनयामुळे चांगला मानव बनता येते, असे आपल्याला वाटत असल्याचे, पंकज त्रिपाठी यांनी नमूद केले. "ज्यावेळी तुम्ही स्वत: दुस-या एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये शिरता आणि त्या व्यक्तीचे विचार, त्यांच्या भावना आणि त्यांचे दृष्टीकोन समजून घेता, तेव्हा तुम्ही एक चांगला माणूस बनता." असं यावेळी त्रिपाठी म्हणाले. अर्थात हे घडत असताना तुम्ही इतरांच्या जीवनातील चांगल्या वाईट घटना, गुण यांचे विश्लेषण करीत असता, निरीक्षण करून समजून घेत असता, त्यामुळेच स्वतःला चांगले बनवण्यासाठी त्या पात्राकडून – त्या व्यक्तिमत्वाकडून तुम्ही शिकता.
नैसर्गिक अभिनय तुमच्याकडून वठला जावा, किंवा तुमचा अभिनय नैसर्गिक वाटला पाहिजे, यासाठी शरीर आणि मन संतुलीत ठेवण्याचे महत्त्व कलाकार पंकज त्रिपाठी यांनी अधोरेखित केले. "स्वतःला व्यक्तिरेखेनुसार घडवण्यासाठी मन आणि शरीराची लवचिकता आणि मोकळेपणा महत्त्वाचा आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी तुम्ही मेंदूतील पात्राला काल्पनिक परिस्थितीमध्ये तुम्हाला हवे ते काम करण्यास भाग पाडता त्याचवेळी पडद्यावर भावनांचे मनोरंजन होत असल्याचे प्रदर्शन होते. यासाठी स्वतःला, मनाला तसे प्रशिक्षित करावे लागते. मात्र कलाकार म्हणून प्रयोगाचे महत्त्व अधोरेखित करताना त्रिपाठी म्हणाले, "प्रयोगामुळे अभिनय जिवंत राहतो." त्रिपाठी म्हणाले की, "ज्यावेळी प्रसिद्धी आणि पैसा यांचा उपयोग चांगल्या हेतूसाठी केला जातो तेव्हाच जीवन सार्थक बनते."