गोवा: कणकुंबी येथे रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको; साखळी- बेळगाव वाहतूक ठप्प | पुढारी

गोवा: कणकुंबी येथे रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको; साखळी- बेळगाव वाहतूक ठप्प

पणजी; पुढारी वृत्तसेवा : साखळी चोर्लाघाट – बेळगाव – जांबोटी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. तरी गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी पारवाड, कणकुंबी व आमटे पंचायतीच्या वतीने आज (दि.४) कणकुंबी येथे रास्ता रोको करण्यात आले.

माजी आमदार अरविंद पाटील, जि.प. सदस्य, तालुका पंचायत सदस्य तसेच तिन्ही पंचायतीचे सरपंच व पंच मंडळांसह नागरिकांनी या आंदोलात मोठ्या संख्येने भाग घेतला. महिलांचाही या आंदोलनात मोठा सहभाग होता.

पारवाड पंचायत क्षेत्रातील पारवाड, चिखले, हुळंद, चौकी, मान, सडा व चोर्ला तसेच कणकुंबी पंचायत क्षेत्रातील कणकुंबी, चिगुळे, बेटणे, आमटे पंचायत क्षेत्रातील आमटे, गवसे, आमगाव, कालमनी आदी सुमारे १५ गावातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

कणकुंबी बसथांब्याजवळ मुख्य रस्त्यावर ठाण मांडून आंदोलक बसल्याने वाहतुकीची कोंडी झाली. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सीपीआय मंजुनाथनाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कुमक तेथे आली. त्यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याची सूचना केली.

मात्र आंदोलक रस्त्यावरून हलले नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलावण्यात आले. तहसिलदार प्रकाश गायकवाड, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व राष्ट्रीय रस्ता प्राधिकरणाचे अधिकारी यांनी गणेश चतुर्थीपूर्वी चोर्ला ते जांबोटी दरम्यानचा खड्डेमय रस्ता दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर व अरविंद पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. येत्या तीन दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. या रस्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती होईल, असे पाटील यांनी सांगितले.

साखळी ते बेळगाव हा रस्ता महत्त्वाचा आहे. गोवा सीमेतील रस्ता चांगला आहे. कर्नाटक सीमेतील चोर्ला ते जांबोटी रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. आणि तो दुरुस्त करावा, हीच आमची मागणी आहे. त्यासाठीच आम्ही रास्ता रोको आंदोलन केले.

– भिकाजी गावडे – पारवाड पंचायतीचे सरपंच

हेही वाचा 

Back to top button