फोंडा / मडगाव : पुढारी वृत्तसेवा : काही दिवस थांबलेले अपघातांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या चोवीस तासात फोंडा – तिस्क आणि मडगावात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. यात बंगळूर येथील पर्यटकाचा व मडगावातील चिरमुरे विक्रेत्याचा समावेश आहे.
बेळगाव – गोवा महामार्गावरील भूमिकानगर तिस्क उसगाव येथील बगल रस्त्यावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता भरधाव कार उलटल्याने विनोदकुमार कृष्णप्पा (३१) हा चालक जागीच ठार झाला, तर मुनिराजू मुनोजिनप्पा (४०), व्यंकटराजू नागराजू (३८) व लोकेश जंगप्पा (४०) हे तिघेजण जखमी झाले. सर्वजण बंगळूर- कर्नाटकातील रहिवासी आहेत. हे चौघे (केए ०३ एनएन २४७०) या कारने बंगळूरहून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. सकाळी ते गोव्यात पोहोचले. त्यानंतर ते मोलेहून फोंड्याच्या दिशेने निघाले असता, भूमिकानगर तिस्क उसगाव येथील धोकादायक वळणावर कारचालक विनोदकुमारचे नियंत्रण सुटल्याने कार सुमारे पंधरा मीटर खोल घळीत कोसळली.
या अपघातात कार चक्काचूर झाली, तर कारचालकाचा बळी गेला. अन्य तिघांवर पिळये-तिस्क उसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. फोंडा पोलिसांनी या अपघाताचा • पंचनामा केला असून मृतदेह बांबोळी इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठविला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दांडेवाडी-चिंचणी येथे ट्रकची धडक बसल्याने सायकलस्वार मकबूलसाब मुदेनूर (७४) यांचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा इस्पितळात आणले आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मकबूलसाब हे कुंकळ्ळी येथे राहत होते. ते सायकलवरूनच चिरमुरे विकण्याचा व्यवसाय करायचे. मडगावच्या दिशेने जात असता गतिरोधावर त्यांना पाठीमागून ट्रकची धडक बसली. अपघातानंतर ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. रवी रामेश्वर सिंग (३५, रा. पणजीपुरा, राजस्थान) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.