गोव्यात दिवसा उकाडा तर रात्री जाणवतेय थंडी | पुढारी

गोव्यात दिवसा उकाडा तर रात्री जाणवतेय थंडी

पणजी : पुढारी वृत्तसेवा : बदल होत आहेत. दिवसभर उकाडा जाणवतो, तर रात्री ९ नंतर थंडावा जाणवतो. त्यामुळे नागरिकांना आजार होण्याचे प्रकार वाढले आहेत. या आजारात घसा दुखणे, अचानक ताप येणे, थंडी, खोकला, सर्दी आणि अंगदुखी असे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे काहीजणांना हृदयाचे त्रास होत असल्याने शहरी भागात आरोग्य खात्याच्या कार्डीयाक १०८ रुग्णवाहिकांची वर्दळ जाणवत आहे.

हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत गोव्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. हवेत उष्मा वाढल्यामुळे लोक थंड पेयांचा आधार घेतात. ज्यांना सवय नसते त्यांना सर्दी, खोकला तापासारखे आजार जडतात.

हवेतील बदलामुळे आजार

राज्यात हवेमध्ये होत असलेल्या बदलांमुळे विविध आजार होण्याचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. उकाडा फारच जाणवत असल्याने शरीर गरम होते. गरम शरीराला आरामाची गरज असते; मात्र काम करणाऱ्या लोकांना बसून राहणे शक्य नाही. हवेतील बदलामुळे थंडी, ताप हे आजार होतात. मात्र सर्व प्रकारच्या रोगावर योग्य ते उपचार सध्या सरकारी इस्पितळात उपलब्ध आहेत, असे आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर यांनी सांगितले.

Back to top button