गोवा : बायकोशी झालं भांडण; मेहुणीच्या मुलाचं अपहरण

गोवा : बायकोशी झालं भांडण; मेहुणीच्या मुलाचं अपहरण
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : घर सोडून गेलेल्या पत्नी आणि मुलांना मेहुणीने लपवून ठेवल्याच्या रागातून बेळगावच्या भावजीने मेहुणीच्या सात वर्षीय मुलाचे अपहरण केले. ही घटना घोटणामड्डी केपे येथे घडली. बसुराज कुट्टूर (२६, रा. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याने या मुलीला रात्रभर शिरवईच्या घनदाट जंगलात लपवून ठेवले होते. पोलिस निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केपे आणि कुडचडे पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबविली. तर सकाळी मुलाला कुडचडे आंबेडकर सर्कल जवळ सोडून पसार झालेल्या संशयिताच्या काही तासांत मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले.

बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घोटणामड्डी येथून अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा प्रकार समोर आला. मुलाची आई शिल्पा सागर प्रसाद यांनी केपे पोलिस स्थानकात तशी तक्रार दिली. हे प्रकरण कुडचडे पोलिस निरीक्षक वैभव नाईक यांच्याकडे वर्ग झाले होते.

याबाबत माहिती अशी, बसुराज कुट्टूर याची मेहुणी घोटणामड्डी येथे आपल्या परिवारासह राहते. बसुराज आणि त्याच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण झाल्याने त्याची पत्नी मुलांना घेऊन घरातून निघून गेली होती. ती गोव्यात तिची बहीण शिल्पा प्रसाद हिच्याकडे गेल्याचा संशय बसुराज याला आला होता. त्यामुळे तो बुधवारी पत्नीच्या शोधासाठी मेहुणी शिल्पा यांच्या घरी आला. मात्र, शिल्पा यांनी त्याच्या बायको-मुलांना आपण आश्रय दिला नसल्याचे सांगून त्यांना जाण्यास सांगितले. मेहुणी आपल्याला आपल्या बायको व मुलांना भेटायला देत नाही, असा समज झाल्याने संतापाच्या भरात बसुराज तिच्या सात वर्षीय मुलाला घेऊन पसार झाला.

या संदर्भात पोलिस तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. बसुराज यापूर्वी अनेक वेळा मेहुणीकडे आला होता. त्याला या परिसराची माहिती होती. त्यामुळे मुलाला घेऊन तो मागील दाराने कालव्याच्या रस्त्याने चालत शिरवईच्या डोंगरावर गेला. एक व्यक्ती मुलाला घेऊन जंगलाच्या दिशेने गेल्याची माहिती काही लोकांनी पोलिसांना देताच सायंकाळी जंगलात शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्रभर पोलिसांनी संपूर्ण डोंगर पिंजून काढला. पोलिस आपल्या मार्गावर आहेत हे समजल्याने घाबरलेल्या अवस्थेत तो मुलाला घेऊन कुडचडेत दाखल झाला.

आंबेडकर सर्कल जवळ वाहतूक पोलिसांना पाहून त्याने मुलाला तिथेच सोडून पळ काढला. दरम्यान, त्याचा फोटो सर्व पोलिसांना पाठवून सतर्क करण्यात आले होते. तसेच कुडचडे किंहा मडगाव रेल्वे स्थानकावरुन तो बेळगावला पळून जाण्याची शक्यता असल्याने दोन्ही रेल्वे स्थानके, बस स्थानके, तपासणी नाक्यांवर सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचवेळी बसुराज याला कुडचडे एलआयबीच्या पोलिसाने सावर्डेत पहिल्यानंतर त्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पाठलाग करून पकडले. पोलिसांनी त्याच्या विरोधात भादंस कलम ३६३ आणि बाल कायद्याच्या कलम आठ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक शिवराम गावस, गौतम शेटकर, हेड कॉन्स्टेबल सुदेश राऊत देसाई, कल्पीत रायकर, धिरज कर्पे, आशिष गावकर, जीत वेळीप, टोनी डिसौजा, तृप्तेश पाटेकर, शांताराम वेळीप, हेड कॉन्स्टेबल विशाल भुईबर, संदीप महाजन, अमर गावकर, व्यंकटेश गावकर, वामन शेटकर आणि सुदेश कालेकर यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला.

बसुराज याला कन्नड शिवाय अन्य कोणतीही भाषा येत नसल्याने पोलिस तपासात अडथळे निर्माण होत आहेत. फक्त रागातून त्या मुलाचे अपहरण करण्यात आले की त्याच्यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी पोलिस दुभाषिकाची मदत घेणार आहेत.

मुलाला रात्रभर ठेवले उपाशी…

मुलाला घेऊन जंगलात गेलेल्या बसुराज याने त्याला काहीच खायला दिले नाही. रात्री कडाक्याच्या थंडीत तो त्याला घेऊन तसाच डोंगरावर लपून बसला होता. पोलिस मागे लागले आहेत, हे लक्षात आल्यानंतर त्याला घेऊन चालत तो कुडचडेत आला. रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने भुकेने व्याकूळ झालेल्या मुलाची पोलिसांनी सुटका करताच त्याने आपल्या आईला कडकडून मिठी मारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news