म्हादईप्रश्नी मंत्र्यांमध्ये प्रचंड अस्वस्थताच ,शहा यांच्या वक्तव्यावर काब्राल, शिरोडकर यांची विरोधी भूमिका | पुढारी

म्हादईप्रश्नी मंत्र्यांमध्ये प्रचंड अस्वस्थताच ,शहा यांच्या वक्तव्यावर काब्राल, शिरोडकर यांची विरोधी भूमिका

पणजी: पुढारी वृत्तसेवा : म्हादईप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना, सरकार मात्र शांत होते. जनतेचा रोष ग्रामसभांमधून व्यक्त झाल्यानंतर मंत्रिमंडळातही अस्वस्थता पसरली आहे. त्याचेच पडसाद सोमवारी उमटले. दोन ज्येष्ठ मंत्र्यांनीच शहा यांच्या वक्तव्याबाबत जाहीरपणे विरोधी भूमिका घेतली.

म्हादई प्रश्नी गोव्याची कायदेशीर बाजू भक्कम असून, त्याचे लवकरच परिणाम दिसून येतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. तर मंत्री नीलेश काब्राल यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत केंद्र सरकारला फटकारले आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली असली तरी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपला मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचे म्हटलं आहे.

अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध : नीलेश काब्राल

पणजी : कर्नाटक राज्य म्हादईचे पाणी खोऱ्यातच आणि केवळ पिण्यासाठी वापरू शकते. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ते पाणी सिंचनासाठी वापरणार असल्याचे सांगितले. हे अयोग्य असून, या विधानाचा मी निषेध करतो, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी केले. ते म्हणाले, आमच्या दिल्ली भेटीत गोवा सरकारच्या संमतीने पाणी कर्नाटकला देणे हा विषयच आला नव्हता. आम्ही सर्वांनी म्हादई वाचवायला हवी असेच सांगितले होते. आम्ही डीपीआर मागे घेण्याबाबतही विनंती केली होती. दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेतही हा विषय निघाला नसावा.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे म्हादई ही त्यांच्या आईप्रमाणे आहे. त्यामुळे ते याबाबत खोटे बोलणार नाहीत. अमित शहा यांनी जे सांगितले ते कोणत्या आधारावर ते मला माहिती नाही. काही दिवसात आमचे शिष्टमंडळ पुन्हा दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी आम्ही या विषयी पुन्हा चर्चा करणार आहोत. तेव्हा आमच्यातील कुणी कर्नाटकला पाणी द्यावे, असे म्हणले होते हेही त्यांना विचारू, केंद्रीय नेते दरवेळी आम्हाला विचारून वक्तव्य करत नसतात. काहीवेळा ते वैयक्तिक पातळीवर वक्तव्ये करत असतात. आज मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला हे मी मुख्यमंत्र्यांना सांगून केले नाही. विरोधकांनाही जर आम्ही कुठे कमी पडत आहोत असे वाटत असेल तर त्यांनीही न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करावी.

शिष्टमंडळ पुन्हा दिल्लीला

काब्राल यांनी सांगितले की. याबाबत विधानसभा सभागृह समिती स्थापन झाली आहे. काही दिवसांत आमचे शिष्टमंडळ पुन्हा दिल्लीला जाणार आहे. त्यावेळीही आम्ही आमची मागणी लावून धरणार आहोत.

शहा यांचे विधान अमान्य : सुभाष शिरोडकर

पेडणे : कर्नाटकला म्हादईचे पाणी वळविण्यासाठी परवानगी देण्याबाबत गोव्याने केंद्राशी कोणतीही चर्चा केलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली टिपणी आम्हाला मान्य नाही. आपण शहा यांच्या दावा मान्य करीत नसल्याचे विधान जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केरी येथील एका कार्यक्रमानंतर केले.

अमित शहा यांनी कर्नाटकच्या सभेत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिरोडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, अशा प्रकारची कोणतीही चर्चा कुठेही झालेली नाही. आम्ही शहा यांना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, गोवा आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये आमची आहेत. आम्ही दोन्ही राज्यांची काळजी घेऊ. म्हादई प्रश्री दोन्ही राज्यांनी सबुरीने घ्यावे, असे सुचवले होते. न्यायालयाच्या माध्यमातून गोव्याला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी राष्ट्रवादी

पणजी : म्हादई प्रश्नी शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खोटे बोलल्याबद्दल गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड कॅस्टो यांनी केली. शहा यांच्या वक्तव्यावरून म्हादईप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. सावंत खोटे बोलत आहेत. म्हादई पाणी वळवण्यास कर्नाटकला मंजुरी देणे म्हणजे गोव्याचा पराभव असल्याचे ते म्हणाले.

सभागृह समितीची ८ रोजी बैठक

पणजी : म्हादई प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या सभागृह समितीची प्राथमिक बैठक बुधवारी, ८ रोजी दुपारी ३:३० वाजता सचिवालयातील पीएसी रूममध्ये होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुबळी येथील वक्तव्यानंतर विरोधकांनी म्हादई सभागृह समितीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्या मागणीला अनुसरून या समितीचे अध्यक्ष जलसिंचन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री सुभाष शिरोडकर हे असतील तसेच जलसिंचन खात्याचे सचिव, कायदा सचिव, जलसिंचन खात्याचे मुख्य अभियंता आदीसह समितीचे सदस्य आमदार उपस्थित राहतील. शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील या समितीमध्ये अँड. कार्लोस फेरेरा, विजय सरदेसाई, बेंझी व्हिएगास श्री वीरेश बोरकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, अलेक्सो रेजिनाल्ड लॉरेन्स, डॉ. देविया राणे, गणेश गावकर, प्रेमेंद्र शेट, जीत आरोलकर व मायकल लोबो या आमदाराचा समावेश आहे. ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.

राज्याची कायदेशीर बाजू भक्कम : मुख्यमंत्री

पणजी : म्हादईच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याबाबत राज्याची कायदेशीर बाजू भक्कम आहे. त्यामुळे जनतेला लवकरच चांगले परिणाम दिसतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. सोमवारी त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. तत्पूर्वी शहीद दिनानिमित्त आझाद मैदानात शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पोलिस महासंचालक जसपाल सिंग, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

भाजप आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास : डॉ. विश्वजित राणे

पणजी : म्हादई प्रश्नावर भाजपचे सर्व आमदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सोबत आहेत. मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो आम्हा सगळ्यांनाही मान्य आहे. या विषयावर त्यांनीच बोलावं अशी आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. दोनापावला येथील एका कार्यक्रमानंतर राणे यांना पत्रकारांनी म्हादई प्रश्नावर शहा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता राणे म्हणाले, हा विषय गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्याने यावर बोलल्यास त्याला अनेक फाटे फुटू शकतात. आम्ही सगळ्यांनीच मुख्यमंत्री डॉ. सावंत हे जे काय बोलतील त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे तेच या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात, असे राणे म्हणाले. म्हादई प्रश्नी आमची भूमिका पूर्वीची होती, तीच आताही कायम आहे. म्हादईचे पाणी आम्ही वळवू देणार नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असून आमची बाजू मजबूत आहे, असे ते म्हणाले.

Back to top button