गोवा डेअरीचे दूध पाच रुपयांनी महागले | पुढारी

गोवा डेअरीचे दूध पाच रुपयांनी महागले

फोंडा : पुढारी वृत्तसेवा :  महागाई प्रचंड वाढली असतानाच आता दुधाचे दरही वाढले आहेत. राज्यातील गोवा डेअरीने हा वाढीव दर उद्या शनिवार, दि. २१ पासून लागू केला आहे. त्यामुळे लिटरमागे चार ते पाच रुपये विविध तऱ्हेच्या दुधाच्या पाकिटावर वाढवण्यात आले आहेत.

गोवा डेअरीने गेल्या मे महिन्यातच दरवाढ केली होती. आता आठ महिन्यांच्या काळात ही दुसरी दरवाढ केली असून लिटरमागे चार ते पाच रुपये दरवाढ झाल्याने दूध ग्राहकांत खळबळ उडाली आहे. नवीन दरवाढीसंबंधीचे परिपत्रक राज्यातील दूध वितरकांना देण्यात आले असून हा वाढीव दर शनिवारी लागू होणार आहे.

नवीन वाढीव दराप्रमाणे स्टैंडर्डाईज्ड दूध अर्ध्या लिटरचे पाकीट २९ रुपये, गायीच्या दुधाचे अर्ध्या लिटरचे पाकीट २७ रुपये, तर हायफॅट दूध ६२ रुपयांवरून एकदम ६७ रुपये करण्यात आले आहे. याशिवाय ४७५ मिलीलिटरचे टोन्ड दुधाचे पाकीट आता २३ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले असल्याने राज्याबाहेरील इतर दूध डेअऱ्यांपेक्षा किमान चार रुपये प्रतिलिटर दूध दरवाढ गोमंतकीयांना सोसावी लागणार आहे. याशिवाय गोवा डेअरीच्या तूप, फ्लेवर्ड मिल्क, दही, लस्सी आदी उत्पादनातही दरवाढ केली आहे. ही दरवाढ गुपचूपरीत्या केली असून कालचा दर आज नसणार आहे.

१ मे रोजी केली होती दरवाढ

गेल्या १ मे २०२२ रोजी गोवा डेअरीच्या दूध दरात वाढ केली होती. त्यावेळेला सरासरी दोन ते तीन रुपये दरवाढ झाली होती. आता आठ महिन्यांच्या आत पुन्हा एकदा दरवाढ झाली असून वर्षभरात सरासरी आठ रुपये दूध लिटरमागे महागले आहे.

Back to top button