गोवा : चोर्ला घाटामध्ये कार दरीत कोसळून दोघे ठार | पुढारी

गोवा : चोर्ला घाटामध्ये कार दरीत कोसळून दोघे ठार

वाळपोई : पुढारी वृत्तसेवा : चोर्ला घाटातील खराब रस्त्याने शुक्रवारी दोघांचा बळी घेतला तर तिघेजण जखमी झाले. बेळगावहून गोव्याकडे येणारी कार दरीत कोसळली. या अपघातात नूर तनुद्दीन शेख (36), सुधीर आत्माराम परब (36, दोघेही राहणार पालघर, महाराष्ट्र) अशी मृतांची नावे आहेत. विनोदकुमार कनहाट, संतोष भवर, अड्री फर्नांडिस अशी जखमींची नावे आहेत. तेही पालघरचे रहिवाशी आहेत.

जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (गोमेकॉत) दाखल केले आहे. तत्पूर्वी साखळी येथील रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

कारने पाचहीजण गोव्याकडे येत होते. दरीतील एका टोकदार वळणावर अन्य वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि मोटार दरीत कोसळली. हे वळण अत्यंत धोकादायक आहे आणि वारंवार अपघात होणारे आहे. येथेच पुन्हा हा अपघात झाला.

दरम्यान, चोर्ला घाटातील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गोवा तसेच बेळगावमधील अनेकांनी अनेकवेळा केलेली आहे. त्याकडे दोन्हीही राज्यांचे दुर्लक्षच झालेले आहे. या टोकदार वळणावर सुरक्षा कवच उभारण्याची मागणीही दुर्लक्षितच आहे.

रस्त्याच्या चिंध्या

चोर्ला घाटातील कर्नाटकाच्या हद्दीतील रस्त्याच्या चिंध्या झाल्या आहेत. येथून वाहने हाकणे जिवघेणे झाले आहे. या रस्त्यामुळे अनेकवेळा अपघात झालेले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनेही नादुरुस्त होऊन प्रवासी घाटातच अडकतात.

Back to top button