पणजी : ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगून जुने गोवे येथील एका महिलेला तब्बल 38 लाख रुपयांचा गंडा घालणार्या एकाला गोवा सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली. अटक केलेल्या संशयित सायबर गुन्हेगाराचे नाव रुतिक अनिल निकम (23 वर्षे, महाराष्ट्र) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी जुने गोवेतील एका रहिवाशाला अॅपद्वारे शेअर बाजारातील व्यापारात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यासाठी आणि त्याला एका सोशल ग्रुपमध्ये जोडले. उच्च परताव्याचे खोटे आश्वासन देऊन, पीडितेला एकूण 38 लाख रुपये वेगवेगळ्या 9 बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले. आर्थिक तपासादरम्यान खातेधारक रुतिक अनिल निकम याच्या बँक खात्यात उच्च परताव्याच्या बहाण्याने तक्रारदाराकडून 2 लाख रुपये जमा करण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला आज शोधून काढले आणि अटक केली. पुढील तपासात असे दिसून आले की हेच बँक खाते भारतातील इतर 22 सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींशी जोडलेले होते. ज्यांची एकूण रक्कम 11.5 कोटी रुपये होती. सायबर पोलिस स्थानक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षत आयुष, पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक शेरविन दा कोस्टा, पोलिस शिपाई सचिन नाईक आणि महेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. दरम्यान, या फसवणूक प्रकरणातील आणखी काही संशयितांना शोधून अटक करणे बाकी आहे. या प्रकरणी दीपक पेडणेकर यांच्याकडून चौकशी सुरू आहे. गोवा पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार सायबर क्राइम पोलिस स्टेशनला करण्याचे आवाहन केले आहे.
एकाच खात्यावरून 22 जणांची फसवणूक करून 11.5 कोटींचा चुना लावण्याचा प्रकार सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. संशयित आरोपीचे हेच बँक खाते भारतातील इतर 22 सायबर आर्थिक फसवणुकींच्या तक्रारींशी जोडलेले होते.

