मडगाव : पैशासाठी ‘त्यांनी’ उमेदवारी विकली | पुढारी

मडगाव : पैशासाठी ‘त्यांनी’ उमेदवारी विकली

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्याच काही जणांनी पैसे घेऊन विधानसभेच्या उमेदवार्‍या विकल्या होत्या त्याची फळे आम्ही भोगत आहोत. ते आठ आमदार पैशांसाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आहेत. अशा आमदारांना पुन्हा मत घालू नये, असे आवाहन दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केले आहे.

दक्षिण गोवा काँग्रेस मुख्यालयात अयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. दाबोळी मतदारसंघातील लिओन रायकार यांचा कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. खासदार फ्रान्सिस सार्दिन, दक्षिण गोव्याचे काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा व इतर उपस्थित होते.

खासदाराला एकूण वीस मतदारसंघ लागतात. आपल्यासाठी काम करणार्‍या लहान कार्यकर्त्यांविषयी खासदारांना माहितीही नसते. आपण अशाच कार्यकर्त्यांच्या बळावर निवडून आलो आहे, असे सांगून सार्दिन यांनी कार्यकर्त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपले आमदार स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी भाजपमध्ये गेले आहेत. काँग्रेसकडे तीनच आमदार शिल्लक आहेत. म्हणून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. भाजपला पराभूत करण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्येच आहे, असे ते पुढे म्हणाले.

येणार्‍या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन सार्दिन यांनी केले आहे. सावियो डिसिल्वा यांनी यावेळी बोलताना पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे अवाहन केले. दाबोळी जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे. सर्वांनी त्यांना निवडून आणण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Back to top button