गोवा : ‘पीएफआय’ची राज्यातील पाळेमुळे खणून काढा | पुढारी

गोवा : ‘पीएफआय’ची राज्यातील पाळेमुळे खणून काढा

पणजी ः पुढारी वृत्तसेवा : राजकीय पक्षांसोबतच विविध संघटनांनीही पीएफआयवरील बंदीचे गोव्यात स्वागत केले आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच संघटनांनी या बंदीचे स्वागत करताना संघटनेची पाळेमुळे खणून काढावीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. समाजात व धर्मामध्ये दुही निर्माण करून अशांतता तयार करणार्‍या संघटनेवर बंदी योग्यच असल्याचे सर्वांचे मत आहे.

गोव्यात पीएफआयचे काम काही वर्षे चालू होते. सासष्टी, मुरगाव तालुक्यासह डिचोली, सत्तरी, बार्देश या तालुक्यांत पीएफआयचे सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने राहत होते. मुरगाव तालुक्यातील बायणा येथे पीएफआयचा सरचिटणीस अनिस अहमद याला शिरसी-कर्नाटक येथे पकडले गेले. त्यामुळे गोव्यात या संघटनेच्या कारवाया सुरू होत्या हे स्पष्ट होते.

त्या दुकानावर बहिष्कार

डिचोली येथील मुस्लिम वाड्यावर एक कापड दुकानदार जो नेहमीच पीएफआयच्या कारवायांचे समर्थन करत होता, तो सध्या फरार झालेला आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट टाकून नेहमीच या संघटनेचे समर्थन करत होता. त्याच्या या कर्मामुळे या भागातील नागरिकांनी त्याच्या कापड दुकानावर बहिष्कार टाकला होता.

वाळपई नगरपालिका भागामध्ये नागवे भागात हल्लीच अनेक बांगला देशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. ज्या वेळी पीएफआयची सभा व्हायची त्यावेळी वाळपई व डिचोलीतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्या सभेला जात होते. दक्षिण गोव्यातील नावेली मतदारसंघांमध्ये एका पंचायतीवर दोन पंच हे पीएफआयचे कार्यकर्ते निवडून आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होते ते पाहावे लागेल.

गोव्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड एनआयएने यापूर्वीच सुरू केलेली आहे. आता त्या संघटनेवर बंदी आल्याने या संघटनेचे कार्यकर्ते भूमिगत होण्याची शक्यता आहे.

कट्टरतावादाची काँग्रेसला जास्त झळ

काँग्रेस पक्ष नेहमीच सर्व प्रकारच्या जातीयवादाच्या विरोधात राहिला आहे आणि राहील. बहुसंख्य, अल्पसंख्याक यात काँग्रेस पक्ष फरक करीत नाही. आपल्या समाजाच्या ध्रुवीकरणासाठी धर्माचा दुरुपयोग करणार्‍या, पूर्वग्रह, द्वेष, कट्टरता आणि हिंसाचार पसरवण्यासाठी धर्माचा दुरुपयोग करणार्‍या सर्व विचारधारा आणि संस्थांशी तडजोड न करता लढण्याचे काँग्रेसचे धोरण नेहमीच राहिले आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांचा कट्टरतावादी व दहशतवाद्यांनी बळी घेतला. राष्ट्राच्या धर्मनिरपेक्षतेचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही ते पार पाडणार, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केली आहे.

बंदी पूर्ण काळासाठी हवी होती

पीएफआय ही देशविरोधी विचाराची संघटना असल्याचे गेल्या काही काळातील त्यांच्या एकूणच कारवायावरून स्पष्ट झालेले आहे. पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देऊन, धर्मामध्ये तेढ निर्माण करत होती. दहशतवादी कारवाया करणार्‍या या संघटनेवर केंद्र सरकारने जी पाच वर्षांसाठी बंदी घातलेले आहेत ती योग्यच आहे. मात्र या संघटनेवर पाच वर्षे कायमचीच बंदी घालायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रभारी क्लायड क्रास्टो यांनी व्यक्त केली आहे.

लव्ह जिहादमुळे समाजात दुही : दीपक ढवळीकर

पीएफआय संघटनेने लव्ह जिहाद सारख्या प्रकारातून समाजामध्ये दुही निर्माण केली. त्याचबरोबर त्यांच्या विचारांना विरोध करणार्‍यांचे गळे कापण्याचे कृत्य केले आहे. हिंदू तरुणींना फसवून तिच्याशी लग्न करून नंतर आपल्या धर्माप्रमाणे वागत नाही म्हणून तिची हत्या करण्याचे सत्र या संघटनेच्या प्रोत्साहनामुळेच घडत होते. केंद्र सरकारने या संघटनेवर घातलेली बंदी योग्य आहे, असे मत मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे.

पाळेमुळे खणून काढा : वेलिंगकर

गोवा सरकारने, गोवेकरांच्या सुरक्षेकरता, या आतंकवादी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्याना तातडीने अटक करावी आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता, त्यांच्या येथील कारस्थानांबद्दल सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतमाता की जय संघाचे संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात..

राष्ट्रीय हित आणि अंतर्गत सुरक्षेसाठी भारत सरकारने उचललेल्या पावलाचे मी स्वागत करतो. पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न इतर 8 संस्थांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केल्याबद्दल मी केंद्रीय गृह मंत्रालयाचे आभार मानतो. मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार फुटीरतावादी आणि भारतविरोधी शक्तींपासून भारताचे संरक्षण करण्यासाठी खंबीर, कटिबद्ध आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Back to top button