

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
गोवा विधानसभेत आतापर्यंत फक्त तेरा महिलांनी आमदारकी भूषवली असून, त्यातील दोन आमदार या स्वीकृत आमदार होत्या. पूर्वी स्वबळावर महिला निवडून यायच्या, आताच्या महिला आमदारांना निवडून येण्यासाठी आमदार पतींचे साहाय्य लाभते.
या पार्श्वभूमीवर महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण मिळाल्यास विधानसभेत महिला आमदारांची संख्या वाढणार आहे. नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले आहे. महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचे हे विधेयक आहे.
या पार्श्वभूमीवर ४० आमदारांच्या गोव्यात किमान १२ ते १३ जागा महिलांसाठी राखीव होतील. सध्या विधानसभेत निवडून आलेल्या तिन्ही महिला आमदार या खुल्या मतदारसंघातून जिंकल्या आहेत. १३ अधिक ३ या जागांचा विचार केल्यास आगामी काळात महिला आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता दिसते.
काँग्रेसमध्ये सक्रिय महिला नेत्यांची वानवा
काँग्रेस पक्ष फक्त निवडणूक काळात संघटना बांधणी व कार्यकर्त्यांना जागरूक करतो. त्यामुळे या पक्षाकडे सक्रिय महिला नेत्यांची संख्या फारच अल्प दिसते. महिला अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप, ॲड. प्रतिमा कुतिन्हो, मनीषा उसगावकर, सुनिता वेरेकर अशा मोजक्याच नेत्या दिसतात. उसगावकर या सध्या काँग्रेसमध्ये नाहीत. वालंका आलेमाव याही काँग्रेसमध्ये नाहीत. काँग्रेस त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देऊ शकतो.
भाजपकडे सक्रिय महिला नेत्या:
राज्यातील राजकीय पक्षांतील सक्रिय महिला नेत्यांची संख्या पाहता भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या प्रमाणात महिला नेत्या आहेत. त्यामुळे ३३ टक्के आरक्षण लागू होऊन राज्यात महिलांसाठी १२ ते १३ जागा राखीव झाल्या, तर भाजपला महिला उमेदवार शोधण्यास जास्त कष्ट पडणार नाहीत.
सध्या भाजपकडे डॉ. देविया राणे व डिलायला लोबो या दोन महिला आमदार आहेत. त्याचबरोबर महिला नेत्यांमध्ये प्रा. सुलक्षणा सावंत, कुंदा चोडणकर, डॉ. शीलत नाईक, महिला मोर्चा अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, दीक्षा कानोळकर, डॉ. स्नेहा भागवत, आरती बांदोडकर, शिल्पा नाईक, डॉ. विद्या गावडे, रंजिता पै अशा अनेक महिला नेत्या सक्रियपणे गेली अनेक वर्षे पक्षीय व सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत.