मुख्यमंत्री हे अंदाज बांधणारे डॉक्टर : गिरीश चोडणकर | पुढारी

मुख्यमंत्री हे अंदाज बांधणारे डॉक्टर : गिरीश चोडणकर

पणजी : पुढारी वृत्तसेवा जमीन हडप प्रकरणात एका मंत्र्याच्या सहभागावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात जुंपली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी चोडणकरांनी खोटे आरोप करण्यापेक्षा एसआयटीकडे तक्रार दाखल करावी, असे म्हणले होते. यावर गिरीश यांनी प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री हे अंदाज बांधणारे डॉक्टर असून त्यांची विधाने हास्यास्पद असतात, अशी टीका केली.चोडणकर म्हणाले की, मुख्यमंत्री अंदाज बांधण्यात पटाईत आहेत.

याआधी त्यांनी माजी मंत्री मिलिंद नाईक निर्दोष असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी सिद्धी नाईकचा मृत्यू बुडून झाल्याचे तर सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज वर्तवला. तसेच मोहम्मद आगा याचा मृत्यू बुडून झाल्याचाही अंदाज केला. यानंतर त्यांनी गोवा 100 टक्के हागणदारीमुक्त असल्याचे भाकीत केले. तसेच 100 टक्के घरात नळाद्वारे पाणी पुरविले जाते असेही सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्याला क्लीन चिट देण्यापूर्वी मी दाखल केलेल्या तक्रारीचा एसआयटी तपास पूर्ण झाली का तेही स्पष्ट करावे, असे आवाहन गिरीश यांनी केले. गेल्या दोन महिन्यांपासून जमीन हडप प्रकरणात एक मंत्री असल्याचा आरोप गिरीश करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सल्वोदोर दि मुंद भागातील जमीन हडप प्रकरणात एक मंत्री असल्याचा आरोप केला होता.

यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र मंगळवारी त्यांनी कोण तरी गिरीश चोडणकर नामक व्यक्ती खोटे आरोप करत असल्याची टीका केली होती. गिरीश यांनी एसआयटीकडे खुशाल तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले. जमीन हडप प्रकरणात आपला एकही मंत्री नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता.

Back to top button