उमेश हरिजन खूनप्रकरण; फुप्फुसावर झाले होते गंभीर वार | पुढारी

उमेश हरिजन खूनप्रकरण; फुप्फुसावर झाले होते गंभीर वार

वास्को ः पुढारी वृत्तसेवा येथील उमेश हरिजन यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या दीपक सहानी (30) व अमीर हुसैन (32) यांना वास्को प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केल्यावर न्यायाधीशांनी सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. उमेश याचा शवचिकित्सा अहवाल मिळाला आहे. फुप्फुसावर गंभीर वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या खूनप्रकरणातील इतर तीन संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यांचा ठिकठिकाणी शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे तसेच कोंबिंग ऑपरेशन सुरू करून तेथे कोणी गुंड लपले आहेत काय तसेच हल्लेखोर व्यक्तींचा शोध घेण्यात येणार असल्याचे वास्कोचे उपअधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले. नगरसेवक रामचंद्र कामत यांनी या प्रकरणात कोणीही राजकारण न आणता पोलिसांना त्यांच्या पद्धतीने योग्य तो तपास करण्यास द्यावा, असे मत व्यक्त केले.

उमेश हरिजन व त्याचा भाऊ विजय (इक्बाल) तसेच त्यांचे साथीदार आणि अमीर हुसैन व त्याचे साथीदार यांचे यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून क्षुल्लक गोष्टींवरून एकमेकांना मारहाण करण्याचे प्रकार सुरू होते. यासंबंधी काही वेळा पोलिस तक्रारी करण्यात आल्या. मयत उमेश याच्याविरोधात चार गुन्हे नोंद झाले आहेत. त्यासंबंधीचे प्रकरण न्यायालयामधये प्रलंबित आहे. संशयित अमीर हुसैन याच्या विरोधात दोन गुन्हे नोंद झाले आहेत. त्यासंबंधीचा खटला सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत.

या खून प्रकरणात पाचजण सामील होते, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यापैकी दीपक सहानी व अमीर हुसैन यांना खून केल्यावर गोव्याबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना फोंडा पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले होते. दीपक सहानी व अमीर हुसैन यांच्यासह काटे बायणा येथे राहणारे परश्या उर्फ परशुराम, जुम्मन, दुर्गोशानंद हे तीनजण सहभागी असल्याने पोलिस त्यांच्या शोधाला लागले आहेत.

संशयित अमीर हुसैन याच्या व्यक्तिरिक्त इतरांचा इतिहास चौकशीअंती उघडकीस येईल, असे राजेश कुमार यांनी सांगितले. वास्कोचे उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत पुढील तपास करीत आहेत.

वास्कोत पोलिसांचे ध्वजसंचलन

खुनाच्या पार्श्वभूमीवर वास्को पोलिसांनी मंगळवारी बायणा ते मांगोरहिल ध्वजसंचलन केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडाची व रोडरोमियांची दखल घेताना त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. वास्कोतील शांतता व कायदा बिघडू नये यासाठी वास्को पोलिस योग्य ती खबरदारी घेत आहे, असे निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले.

Back to top button