कुडचडे गोळीबार प्रकरण : डबल बॅरल बंदुकीचा वापर? | पुढारी

कुडचडे गोळीबार प्रकरण : डबल बॅरल बंदुकीचा वापर?

मडगाव ः पुढारी वृत्तसेवा कुडचडेच्या खून प्रकरणात ज्या डबल बॅरल बंदुकीतून कामगारांवर गोळीबार करण्यात आला ती बंदूक चालवणे नवख्या व्यक्तीला शक्य नाही, शिवाय ती बंदूक आता बाजारपेठेत विकलीही जात नाही. अनेक शिकारी मोठ्या रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी अशा बंदुकांचा वापर करतात. सहजपणे त्या बंदुकीची काडतुसे प्राप्त होत नाहीत. डबल बॅरल प्रकारातील ती बंदूक अतिशय जुनी आणी दुर्मीळ बनावटीची असून, अनेकदा त्यात लोखंडी गोळे भरून शिकारीसाठी ती वापरली जाते. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या त्या बंदुकीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे झाले आहे.

कुडचडे पोलिस स्थानकाच्या हद्दीत नदीतून रेती काढण्याच्या वादात गोळीबार करून कामगाराचा खून होण्याच्या घटनेला पाच दिवस उलटले आहेत; पण अजून पोलिसांना युसूफ आलम या कामगाराच्या मारेकर्‍यांपर्यंत पोहोचता आलेले नाही. बॅरल प्रकाराच्या बंदुकीतून कामगारांवर गोळी झाडली होती, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या बंदुकीपर्यंतही पोलिस पोहोचलेले नाहीत. जुआरी नदीच्या शेल्डे येथील फाट्यात गेल्या आठवड्यात गुरुवारी हा गोळीबार झाला होता. या गोळीबारात युसूफ आलम या कामगाराचा मृत्यू झाला होता तर मोहम्मद साहू हा कामगार गंभीर जखमी झाला होता. मयत युसूफ याच्या शरीरात नऊ तर जखमी झालेल्या साहू याचा पाठीतून पाच लोखंडी गोळे काढले आहेत.

या घटनेला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. गोळीबारासाठी वापरण्यात आलेली बंदूक आणि हल्लेखोर अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. ज्या बंदुकीतून हा गोळीबार झाला ती बंदूक डबल बोअर म्हणजे दोन नळ्या असलेली आहे, या निकषांवर पोलिस पोचलेले आहेत. मृताच्या शरीरात पोलिसांना काडतुसितील लोखंडी गोळे सापडले आहेत. गेले पाच दिवस पोलिस ती बंदूक शोधण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. त्यासाठी शेल्डेच्या बाजूचा नदीचा किनारा पोलिसांनी पिंजून काढला आहे. काळ्या बाजारपेठेत या बंदुकीची किंमत सत्तर ते ऐशी हजार रुपये आहे. अधिक चौकशी केली असता पूर्वी परवाने दाखवून मडगाव मधून त्या बंदुकीची काडतुसे खरेदी केली जाऊ शकत होती; पण आता गोळीबारांची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन काडतुसांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यात आले आहे.

मडगावच्या गांधी मार्केट परिसरात असलेल्या व्यापार्‍यांनी काडतुसांची विक्री बंद केली आहे. अशा परिस्थितीत त्या हल्लेखोरांकडे काडतुसे कोठून आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी कुडचडे आणि सावर्डे भागातील शिकार्‍यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. परवाना असलेल्या शेल्डे भागातील काही काही शिकार्‍यांची पोलिसांनी आयआरबी कॅम्प मध्ये नेऊन चौकशीही केली आहे. काही शिकार्‍यांनी आता डबल बोअरच्या बंदूका क्वचितच आढळून येतात आणि काडतुसा मिळत नसल्याने लोकांनी त्या वापरणे बंद केले आहे,
असे सांगितले.

या बंदुका वजनाने भारी असतात त्यामुळे त्या हातळण्यासाठी अनुभवाची आवश्यकता असते. खांद्याला लावून चालवल्या जाणार्‍या या बंदूकिचा चाप ओढताना अनेक वेळा खांद्याचे हाड सुटण्याचा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. या विषयी कुडचडे पोलिसांशी शौकशी केली असता त्यांनी सर्व पुरावे हाती आल्यानंतर स्पष्ट केले जाईल अशी माहिती दिली आहे.

पोलिस अधिकारी म्हणतो, थोडे थांबा.

पोलिस अधीक्षक सॅमी तावरीस यांनी दै ‘पुढारी’स सांगितले की, गोळी कोणत्या प्रकाराच्या बंदुकीतून चालवण्यात आली हे आताच स्पष्ट करता येणार नाही. मयत आणी जखमीच्या शरीरात लोखंडी गोळे सापडले आहेत त्यावरून ती बंदूक शिकारीसाठी वापरली जाते, हे स्पष्ट होत आहे. काळोखात शिकार टिपता येत नाही. त्यासाठी लोखंडी गोळे भरलेली काडतुसे वापरली जातात. चाप ओढताना काडतुसांतून लोखंडी गोळे पसरून रानटी जनावरांना सहजपणे लक्ष्य केले जाते.

आठ पथकांद्वारे तपास

या गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची एकूण आठ पथके आहेत. ज्यात अनुभवी पोलिसांबरोबर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांचा समावेश आहे, अशी माहिती अधीक्षक तावरीस यांनी दिली आहे. रेती व्यावसायिक, हाताने रेती काढणारे व्यावसायिक, रेती उपशाचे कामगार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार, परवाना धारक बंदुकांचे मालक अशा अनेकांची कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे

 

Back to top button