गोवा : मोप विमानतळावर उतरले पहिले विमान; अधिकार्‍यांनी केला मुंबई-गोवा प्रवास (Video) | पुढारी

गोवा : मोप विमानतळावर उतरले पहिले विमान; अधिकार्‍यांनी केला मुंबई-गोवा प्रवास (Video)

पेडणे ः पुढारी वृत्तसेवा :  गोव्यातील मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (दि. 5) पहिले विमान उतरले. मुंबई येथून सकाळी 10 वाजता विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना घेऊन निघालेले इंडिगो कंपनीचे विमान मोप विमानतळावर सकाळी 11.30 वा. उतरले. अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ही चाचणी यशस्वी झाली. यानंतर विमानाने यशस्वी उड्डाणही केले.

मोप विमानतळावरून पहिले उड्डाण 15 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी जाहीर केले होते. परंतु, धावपट्टीचे काम अर्धवट असल्याने तसेच अधून-मधून अडचणी निर्माण होत असल्याने उद्घाटन सोहळा लांबणीवर पडत आहे. जोपर्यंत केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडून धावपट्टी चाचणी किंवा सुरक्षतेच्या बाबतीत परवाना मिळत नाही, तोपर्यंत विमानतळावरून कोणत्याच प्रकारचे विमान उड्डाण केले जात नाही. त्यानुसार सुरुवातीला प्रवासी नसलेल्या विमानाची चाचणी
करण्यात आली होती.

सोमवारी मुंबईहून 6 ई 9001 हे इंडिगो कंपनीचे विमान काही अधिकार्‍यांना घेऊन सकाळी दहाच्या दरम्यान मुंबईहून निघाले, ते मोप
विमानतळावर 11.15 च्या दरम्यान उतरले. त्यानंतर अधिकार्‍यांनी धावपट्टी आणि विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. पाहणीचा अहवाल केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे दिला जाणार आहे. मोप विमानतळासाठी सरकारने सुमारे एक कोटीपेक्षा जास्त चौ. मी. जमीन संपादन केली आहे.

या प्रकल्पासाठी जमीन शेतकर्‍यांनी दिली आहे. पण, त्याचा योग्य तो मोबदला दिला नसल्याचा आरोप करत काही पीडित शेतकर्‍यांनी आंदोलन केले आहे. विमानतळावर जाणार्‍या लिंक रस्त्यासाठी सहा लाखपेक्षा जास्त चौरस मीटर शेतजमीन घेण्यात आली आहे. त्यावरूनही शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते

भुयारांचे काय?

मोप विमानतळ पठारावर अनेक प्रकारची भुयारे आहेत. ती कुठून कुठेपर्यंत जातात याचा अभ्यास करावा, अशी मागणी मोप विमानतळ पंचक्रोशी जन संघटनेने सरकारकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी विमानतळ धावपट्टी लगतच मोठा खड्डा पडला होता. दोनशे पेक्षा जास्त ट्रक माती घालून तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न झाला. तो खड्डा भुयाराचा भाग असल्याचा दावा समितीचे सदस्य उदय महाले यांनी करून, भविष्यात रन-वेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली

उद्घाटन कधी?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 15 ऑगस्ट रोजी मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबर महिन्यात उद्घाटनाचा सोहळा करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे उद्घाटन कधी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Back to top button