

पणजी : राज्यात मागील साडेतीन वर्षांत गोवा पोलिसांच्या विविध विभागांनी शाळा आणि महाविद्यालय परिसरात ड्रग्ज तस्करी प्रकरणी 14 गुन्हे नोंद करून 18 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 71.79 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. वरीलपैकी 6 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, तर 8 गुन्ह्यांचा तपास पोलिस करत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात दिली.
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. त्यानुसार, 2022 मध्ये 4 गुन्हे दाखल करून 5 जणांना अटक केली आहे. 2023 मध्ये 3 गुन्हे दाखल करून पाच जणांना अटक केली. 2024 मध्ये 6 गुन्हे दाखल करून 7 जणांना अटक केली. 2025 मधील सहा महिन्यांत एक गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. वरील कालावधीत अटक केलेल्या पैकी 3 गोमंतकीय, 12 परप्रांतीय तर 3 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
वरील कालावधीत गोवा पोलिसांच्या विविध पोलिसांनी 71 लाख 79 हजार 300 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले. यात सर्वाधिक अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) 6 जुलै 2022 रोजी हणजूण पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका शाळेच्या परिसरात छापा टाकून 32 लाख 33 हजार 800 रु. किमतीचे 213.56 ग्रॅम हिरोईन आणि 109.82 ग्रॅम एमडीएमए जप्त केले होते. त्यावेळी एएनसीने एका विदेशी नागरिकाला अटक केली होती, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात दिली.