पणजी : एप्रिलमधील पावसाच्या सरासरीत 44.5 मि.मी.ने वाढ | पुढारी

पणजी : एप्रिलमधील पावसाच्या सरासरीत 44.5 मि.मी.ने वाढ

पणजी : पुढारी वृत्तसेवा

यंदा राज्यात एप्रिल महिन्यात पडणार्‍या सर्वसाधारण पावसाच्या सरासरीत 44.5 मिमीने वाढ झाली आहे. यंदाच्या एप्रिलमध्ये राज्यात सरासरी 52 मिमी पावसाची नोंद झाली असून राज्यात एप्रिलमध्ये सरासरी 7.5 मिमी पावसाची नोंद होते. हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने ही माहिती दिली आहे.

1901 सालापासून विचार करता यंदाच्या एप्रिलमधील सरासरी पाऊस सहावा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. 1937 मध्ये सर्वाधिक 229 मिमी पावसाची नोंद झाली होती. असे असले तरी 1901 मध्ये राज्यात केवळ एक पाऊस मापक यंत्र होते . 2013 पर्यंत त्यात वाढ होऊन त्यांची संख्या 13 झाली असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

तापमानाचा विचार करता पणजी येथे 22 एप्रिल रोजी सर्वाधिक 36.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 1969 पासून विचार केल्यास हे पणजीमधील आठवे मोठे तापमान आहे. 7 एप्रिल 1989 रोजी पणजीत सर्वाधिक 39.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यावर्षी पणजीमध्ये एप्रिल महिन्यातील तीन दिवस तापमान 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होते.

पेडण्यात सर्वाधिक पाऊस

एप्रिलमध्ये पेडण्यात सर्वाधिक 134 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल साखळीत 101, तर म्हापसामध्ये 72.7 मिमी पाऊस पडला. केपे तालुक्यात सर्वात कमी 5 मिमी पाऊस पडल्याची माहिती खात्याने दिली आहे.

तापमान वाढणार

राज्यात मंगळवार ते गुरुवार दरम्यान तापमानात 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील चार दिवस वातावरण कोरडे राहणार आहे. रविवारी पणजीचे कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस होते.

Back to top button