पणजी : कंत्राटी पद्धत बंद करा | पुढारी

पणजी : कंत्राटी पद्धत बंद करा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कंत्राटी पद्धत बंद करा व रोजंदारीत वाढ करा, अशी मागणी करीत आयटक या कामगार संघटनेने रविवारी कामगार दिनानिमित्त पणजीत भव्य मोर्चा काढला. पणजी बसस्थानक ते चर्च चौक असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणा दिल्या गेल्या. तेथील चौकात आयोजित जाहीर कार्यक्रमात आयटक गोवा सरचिटणीस ख्रिस्तोफर फोेन्सेका यांच्यासह इतर नेत्यांची भाषणे झाली.

कंत्राटी कामगारांना कायम करा, किमान वेतनवाढ द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. कदंब महामंडळ, नदी परिवहन खाते, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच इतर सरकारी खात्यांमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कामगारांना सरकारने त्वरित सेवेत कायम करावे. केंद्र सरकार कामगार विरोधी असून ते केवळ भांडवलदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी फोन्सेका यांनी केला.

कामगार नेते अ‍ॅड. सुहास नाईक म्हणाले की, कदंब महामंडळात अनेक वर्षांपासून चालक-वाहक कंत्राटी पद्धतीवर आहे. दुसरीकडे कायम कर्मचार्‍यांनाही अद्याप सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळालेली नाही. मागील काही वर्षांपासूनची ओव्हरटाईमची थकीत रक्कम येणे आहे ती त्वरित द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. नाईक यांनी केली.

रोजगाराचा प्रश्न सोडवा

इतर राज्यांमध्ये कामगारांना किमान वेतन हे 600 रुपयांच्या वर आहे. केवळ गोव्यातच ते 389 रुपये इतके कमी आहे. कोरोनामुळे देशातील 2 कोटी 10 लाख लोकांनी आपला रोजगार म्हणजेच नोकर्‍या गमावल्या आहेत. याशिवाय बेरोजगारांची संख्या मोठी असून रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, असा ठराव यावेळी घेण्यात आला. सरकार जोपर्यंत कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करीत नाही, तोपर्यंत या कामगारांना समान काम समान वेतन या धर्तीवर पगार द्यावा. कंत्राटी कामगारांना कायम कर्मचार्‍यांप्रमाणेच पगार मिळावा , असा ठरावही संमत केला . आयटकचे नेते अ‍ॅड. राजू मंगेशकर, अ‍ॅड . प्रसन्ना उटगी आदी उपस्थित होते.

Back to top button