

काव्या कोळस्कर
पणजी : राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विविध टप्प्यांवर सरकारी योजना राबवल्या जातात. या पार्श्वभूमीवर गोवा शिक्षण विकास महामंडळातर्फे दिल्या जाणार्या व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजनेंतर्गत मागील 5 वर्षांत 131 विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना तब्बल 9,57,26, 316 कोटी रुपयांचे व्याजमुक्त शिक्षण कर्ज वितरीत करण्यात आले आहे. हा आकडा केवळ परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा असून या योजनेद्वारे अनेक विद्यार्थी देशभरातही शिक्षण घेत आहेत.
2005 पासून सुरू झालेल्या या योजनेतून आतापर्यंत 10 हजार विद्यार्थ्यांना तब्बल 250 कोटींचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे. या योजनेत आधीपेक्षा काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये देशांतर्गत शिक्षणासाठीच्या कर्जाची रक्कम 7 लाखांवरून 12 लाख, तर परदेशी शिक्षणासाठी कर्जाची रक्कम 12 लाखांवरून 20 लाख करण्यात आली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्यासाठी अधिक मुभा प्राप्त झाली.