Goa Congress : पर्रीकरांसंबंधी काँग्रेस नेत्यांचे आक्षेपार्ह विधान | पुढारी

Goa Congress : पर्रीकरांसंबंधी काँग्रेस नेत्यांचे आक्षेपार्ह विधान

पणजी/मडगाव ; पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वाद उफाळून आला आहे. याबाबत, भाजपने काँग्रेसच्या या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अद्याप काँग्रेसकडून याविषयी काहीही स्पष्टीकरण आलेले नाही. (Goa Congress)

वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाणारे खासदार सार्दिन यांनी माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या विधानाने सार्दिन यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला अडचणीत आणले आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे सार्दिन यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. दरम्यान, काँग्रेसने याबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही.

कुडतरीतील काँग्रेसच्या सभेत सार्दिन यांनी पर्रीकरांविषयी अशोभनीय शब्दांचा सार्वजनिक ठिकाणी वापर केला. पर्रीकर यांच्याविषयी विधान करताना सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्यामुळे दक्षिण गोव्यात संतापाची लाट उमटली आहे. समाज माध्यमांतून त्याविषयी तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

याशिवाय काही नेटकर्‍यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रवक्ते शर्मद रायतुरकर यांनी सार्दिन यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. पर्रीकर यांना राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एक प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाते. सार्दिन यांच्या वक्तव्याचा भाजप निषेध करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खासदार सार्दिन आणि कामत यांनी माफी मागावी

खासदार सार्दिन आणि विरोधी पक्षनेते कामत यांनी (स्व.) मनोहर पर्रीकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांनी गोमंतकीयांची माफी मागावी, अशी जोरदार मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, दिवंगत व्यक्तीविषयी बोलू नये, कारण ती व्यक्ती उत्तर देण्यासाठी आपल्यात नसते याचेही भान हरवलेल्या सार्दिन यांनी पर्रीकर यांचा नव्हे तर कल्याणकारी गोव्याचे शिल्पकार दिवंगत मनोहर पर्रीकर म्हणजे गोमंतकीयांच्या भाईंचा अपमान केला आहे. सोमवारी सार्दिन व कामत यांच्या काँग्रेस पक्षाला गोमंतकीय जनता धडा शिकवेल.

कुडतरी येथील सभेत खासदार सार्दिन यांनी पर्रीकर यांच्याविषयी अशोभनीय भाषा वापरली. सार्दिन यांना टीकाच करायची होती तर ती आमच्यावर करता आली असती. आमच्या पक्षावर, नेत्यांवर टीका करा. त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ. जी व्यक्ती या जगात नाही ती आपल्यावरील टीकेला उत्तर देऊ शकत नाही. पर्रीकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या राज्याच्या विकासाचाच ध्यास घेतला होता.

राज्याला प्रगतीपथावर नेण्यात त्यांचे असलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन करायचे नसते. सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नाही म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना आलेले नैराश्य समजून येते. परंतु, आक्षेपार्ह शेरेबाजी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, जनताच त्यांना धडा शिकवेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Goa Congress : सार्दिन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्याशी यासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे मत समजू शकले नाही.

दिगंबर कामत काय म्हणाले?

दिगंबर कामत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पर्रीकर यांच्याबद्दल अशोभनीय विधान केले होते. त्यानंतर ते म्हणाले की, माझी देवावर नितांत श्रद्धा आहे. तुम्ही लोकांना फसवू शकता, पण देवाला नाही.

Back to top button