

वास्को ; पुढारी वृत्तसेवा : जेथे जेथे जाल, तेथे तेथे भूमिपुत्रांना न्याय द्या, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार आम्ही येथील भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आलो आहोत, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे शुक्रवारी प्रचार सभेत सांगितले. नवा गोवा घडवू या, असे आवाहन त्यांनी केले.
वास्कोचे शिवसेना उमेदवार मारुती शिरगावकर, कुठ्ठाळीच्या उमेदवार भक्ती खडपकर, केपेचे उमेदवार आलेक्स फर्नांडिस यांच्या प्रचारसभेचे आयोजन दक्षिण पश्चिम रेल्वे हॉलमध्ये केले होते.यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले , आपण सांखळीमध्ये प्रचार करणार आहे. परंतु तेथे जोडसाखळी करणार नाही. कोविड काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कार्याची सर्वानी वाहव्वा केली. गोव्यातील निवडणुकीच्या रणांगणात उतरताना गोवेकरांचा आवाज ऐकण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे.
गोव्यामध्ये विकास झाला असे म्हटले जाते. परंतु पाणी समस्या सुटली नाही. केंद्रातील नेते येऊन सांगतात की आम्ही हे करू, ते करू. मग दहा वर्षे तुमची सत्ता असताना त्या गोष्टी का केल्या नाहीत ?
यावेळी खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव अनिल देसाई, खासदार विनायत राऊत, मंत्री उदय सामंत,आमदार दीपक केसरकर, आमदार प्रकाश फातर्पेकर, आमदार वैभव नाईक, खासदार राजन विचारे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.