गोवा निवडणूक : 'ती' च्या मतदानाची संघर्षमय कथा; नऊजणी बजावणार प्रथमच हक्क

गोवा निवडणूक : 'ती' च्या मतदानाची संघर्षमय कथा; नऊजणी बजावणार प्रथमच हक्क

गोवा निवडणूक : 'ती' च्या मतदानाची संघर्षमय कथा
Published on

पणजी : जयश्री देसाई : आपण एका कुटुंबात जन्माला येतो. ज्या गावात जन्म झाला तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये आपले नाव नोंदवले जाते. या प्रक्रियेनंतर शासनाच्या लेखी आपण जनगणनेत सामील होतो. 18 वर्षानंतर मतदार म्हणून यादीमध्ये आपले नाव नोंदवले जाते. मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. ही भारतीय नागरिक म्हणून मतदानाचा अधिकार मिळवण्याची साधी प्रक्रिया असते. त्यातही निवडणुका जवळ आल्या की, त्या-त्या प्रभागातले राजकारणी नवमतदारांची नावे नोंद करून घेतात. मात्र, देशात एक वर्ग असाही आहे जो सतत चर्चेत असला तरी या वर्गाला मतदानाचा मूलभूत हक्क मिळत नाही. त्यांना तो झगडून मिळवावा लागतो. त्यांच्या या संघर्षाची सुरुवातच त्यांच्या ओळखीपासून सुरू होते. समाजात त्यांचे अस्तित्व असते मात्र, समाजाकडून त्यांची ओळख नेहमीच दुर्लक्षीत असते. ही गोष्टही अशा एकाच ओळखीची आहे.

मधू हे तिचे आताचे नाव. गोवा विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या 9 तृतीयपंथींमधील एक. राज्यात पहिल्यांदा मतदान करणारी तृतीयपंथी म्हणून तिचे नाव काहींना माहिती आहे. मात्र, मतदानाचा मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी तिला प्रचंड झगडावे लागले आहे.

तिच्या या गोष्टीची सुरुवात उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील भरवली गावातल्या सुदर्शन गुप्ता पासून होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सुदर्शनला लहानपणी मुलींचे कपडे घालायला, मुलींसारखे नटायला आवडायचे. आपण कुणीतरी वेगळे आहोत याची त्याला तेव्हाच जाणीव झालेली. आईला त्याने हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला. सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या आईने काही काळानंतर त्याला मानसोपचारतज्ञांकडे नेले. उपचाराअंती हा मानसिक आजार नसून सुदर्शनचे शरीर पुरुषाचे असले तरी त्याच्या भावना स्त्रियांच्या आहेत हे सिद्ध झाले. सैरभैर झालेल्या घरच्यांनी वयाच्या 11 व्या वर्षी त्याला घरातून बाहेर काढले. अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडलेल्या सुदर्शनपुढे पहिला प्रश्न जगण्याचा आणि मग पुढचा अस्तित्वाचा होता.

आपण धड स्त्री नाही की पुरुष. मग आपण नेमके कोण आहोत? आपल्याला आता घर नाही, नातेवाईक नाहीत, तर आपली ओळख काय? असे प्रश्न समोर असताना सुदर्शन गोव्यात येऊन पोहोचला. सुरुवातीला कदंब बसस्थानकावर भीक मागून उदरनिर्वाह चालवला. शारीरिक हालचाली आणि एकूण वागण्यावरून प्रियांका लमाणी या त्याच्या गुरुंना सुदर्शन आपल्यापैकीच एक आहे हे जाणवले. त्यांनी त्याला आपला चेला केले आणि आपल्या समूहात सामील करून घेतले. सुदर्शनला मधू हे नाव त्यांनीच दिले.

प्रियांका यांनी सांगितले, नाचगाणे शिकून घे, आपल्याला कुणी काम देत नाही. लोकांच्या लग्नसमारंभात, नामकरण सोहळ्यात व इतर कार्यक्रमांमध्ये नाचून उदरनिर्वाह चालविणे हेच आपले काम आहे. मधुने नृत्य शिकण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन डान्सबारमध्ये नाचण्यास सुरुवात केली. प्रियांकांच्या मदतीने तृतीयपंथींसाठी काम करणार्याम दर्पण संस्थेची माहिती झाली. भीक मागणार्याृ सुदर्शन पासून सुरू झालेल्या नंतर नाचणार्याय मधुचा प्रवास दर्पणमध्ये सामाजिक काम करणारी मधू गुप्ता इथपर्यंत आला. मधल्या काळात मुक्त विद्यापीठातून 12 वी पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. राज्यातील इतर तृतीयपंथीसाठी काम सुरू केले.

दर्पणमध्ये मूलभूत अधिकारांसाठी काम करत असताना तिला आपणही देशाचे नागरिक आहोत, आपल्यालाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे याची जाणीव झाली. पण मग आधार, मतदान ओळखपत्र यासाठी मूळ कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. घर तर केव्हाचेच सुटलेले. दर्पणच्या कामामुळे चांगल्या ओळखी झाल्या होत्या. तिच्या काकांची मुलगा इथेच असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडूनही सहकार्य मिळाले. त्याच्या पत्यावर आधार कार्ड, तृतीयपंथीयांचे कार्ड आणि आता मतदान ओळखपत्र असा हा प्रवास झाला. यावर्षी ती पहिल्यांदा मतदान करणार आहे. ती एकटीच नाहीतर तिच्यासोबत तिच्या आणखी 8 मैत्रिणीही मतदान करणार आहेत. आम्ही भारताचे नागरिक या संविधानाच्या प्रस्तावनेतील खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक ही संज्ञा आमच्यासाठी आता सार्थ झाली आहे. भारताचे कायदेशीर नागरिक झाल्याचा आनंद झाल्याचे मधू सांगते.

आतापर्यंत आयुष्यात खूप डाग लागले. पण बोटाला लागणार्याा काळ्या डागाचा एक वेगळाच आनंद असणार आहे. हा काळा डाग बोटाला लागण्याची आता मला प्रतीक्षा आहे. ही केवळ भरवलीच्या सुदर्शनच्या अस्तितवाची नाही, तर कदंब बसस्थानकापासून सुरू झालेल्या मधुच्या अस्तित्व आणि अभिमानाची गोष्ट आहे, असे मधू म्हणते. गोष्ट साधी आहे पण सोपी नक्कीच नाही. कारण ही केवळ ङ्गतीफ ची नाही, तर तिच्या सारख्या असंख्य ती च्या मतदानाची गोष्ट आहे.

साडी, चुडीदार तत्सम स्त्रियांचे कपडे घालून सिग्नलवर, रेल्वे स्थानकावर, बाजारात पैसे मागणारे एवढीच आमची ओळख नसते. आम्हालाही शिक्षण, सन्मान, आपलेपणा या सगळ्याची गरज असते. तुम्ही आम्हांला एका टॅब्यूमध्ये अडकवून ठेवता. म्हणून सामान्य माणसांना जे अधिकार सहज मिळतात त्यासाठी आम्हांला संघर्ष करावा लागतो. पण त्यातही आनंद आहे. यातूनच आम्हांलाच आम्ही नव्याने सापडतो. आमच्यातल्या वेगळेपणाची जाणीव होते. त्यामुळे आम्हाला बघून नाक मुरडणार्याप प्रत्येकाचे खूप धन्यवाद असे मधू तिच्या विशिष्ट स्वरात सांगते तेव्हा तिच्या संघर्षाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news