गोव्यातील कोलवाळ कारागृहात कैद्यांजवळ ७४ मोबाईल, ड्रग्ज सापडले | पुढारी

गोव्यातील कोलवाळ कारागृहात कैद्यांजवळ ७४ मोबाईल, ड्रग्ज सापडले

म्हापसा ; पुढारी वृत्तसेवा

कारागृह व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेची लक्तरे वेशीवर टांगणारे अनेक कारनामे अलीकडच्या काळात पुढे येऊ लागले आहेत. अशाचप्रकारे बुधवारी पुन्हा एकदा कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद्यांजवळ मोठ्या संख्येने मोबाईल संच, तसेच अमली व तंबाखूजन्य पदार्थ आढळले.

सूत्रांच्या माहितीनुसार, कारागृहात तुरुंग प्रशासनाने अचानक छापा घालत, बरॅकमधून जवळपास 74 मोबाईल संच, तसेच अमलीपदार्थ जप्त केले. परंतु, अधिकार्‍यांनी अशाप्रकारे कुठलेच साहित्य जप्त केले नाही, असा दावा केला आहे. तुरुंग प्रशासन अशाप्रकारे नेहमीच अधूनमधून छापा मारते, असे वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

कोलवाळ कारागृहात कैद्यांना बेकायदा सवलती देण्यापासून तुरुंगात अमलीपदार्थांचा पुरवठा करण्यापासून कैद्यांकडून पलायनाचे अयशस्वी प्रयत्न यापूर्वी घडले आहेत. तसेच कैद्यांजवळ मिळणारे मोबाईल संच यासारख्या प्रकारामुळे पुन्हा एकदा या कारागृहातील सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकूणच कारागृहातील कारभार हा रामभरोसे सुरू असल्याचा प्रत्यय या बुधवारच्या प्रकारानंतर उघड झाला. ड्रग्स असो, मेजवाणी असो किंवा मोबाईल असो, पाहिजे त्या सुखसोयी या कारागृहातील कैद्यांना मिळतात, असे एकंदर घटनाक्रमांमुळे दिसते. अ)लीकडच्या काळात या कारागृहामधून कैदी पळून जाण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत आहे.

गेल्यावर्षी, दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी, याच कारागृहातील खोलीत भिंतीला भगदाड पाडून पसार होण्याचा कैद्याचा प्रयत्न फसला. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारागृहातील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने सदर कैद्याचा डाव फसला. विशेष म्हणजे, याच कैद्याने यापूर्वी दोनवेळा कोलवाळ कारागृहातून पलायन केले होते आणि पुन्हा त्याला पोलिसांनी अटक केली होती.
कैदी रामचंद्रम यल्लाप्पा असे संशयिताचे नाव आहे. यापूर्वीही रामचंद्रन या कैद्याने दोनदा पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. एका ब्रिटिश महिलेवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी 2018 साली रामचंद्रन यल्लाप्पा यास अटक केली होती. त्याच्याविरुद्ध या गुन्ह्याव्यतिरिक्त कारागृहातून पलायनाचे दोन गुन्हे, तसेच घरफोड्या, चोर्‍यांचे गुन्हे नोंद आहेत.

यापूर्वी कोलवाळ कारागृहातून यशस्वीरित्या पळून गेल्याची प्रकरणे आहेत. मध्यंतरी हेमराज भारद्वाज (27) असे या तरुण कैद्याचे नाव होते. तो मूळचा हिमाचल प्रदेशामधील. स्वच्छतेची कामे करण्यासाठी काहीकाळ बाहेर आणलेल्या त्या कैद्याने तेथून पलायन केले होते.
कोलवाळ कारागृहात कैद्यांकडून रॅगिंगचा प्रकार घडला होता. बाणावली किनारी घडलेल्या अल्पवयीन युवतींवरील लैंगिक अत्याचारातील चारही संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार त्यांची कोलवाळ कारागृहात रवानगी केली होती.

कारागृहातील क्वारंटाईन सेलमधील इतर कैद्यांकडून तिघांची रॅगिंग केलेे होती. एक संशयित कोरोनाबाधित झाल्याने या रॅगिंगपासून वाचला होता. संशयितांना नग्न करून उठाबशा काढायला लावणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.याच कारागृहातून पलायन केलेले दोघे संशयित हे नंतर दुसर्‍या दिवशी कारागृहातील जुन्या कार्यालयात रात्रभर लपून बसले होते आणि पहाटे संरक्षक भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना दोन्ही कैद्यांना कारागृह प्रशासनाने ताब्यात घेतले. ही घटना मार्च 2021 मध्ये घडली होती. उपेंद्र नाईक व हुसैन कोड अशी संशयितांची नावे होते.

कारागृहातील एका जेलगार्ड बुटात ड्रग्स घेऊन जाताना सापडला होता. त्यानंतर संबंधित या जेलगार्डला निलंबित केले होते. शिवाय कैद्यांच्या खोलीत अंमलीपदार्थ सापडण्यापासून कारागृहातील कर्मचार्‍यांकडून कैद्यांना ड्रग्स पुरविण्याबाबत अधिकार्‍यांवर निलबंनाची कारवाई ओढविण्याची नामुष्की याच कारागृहात आलेली आहे.

यल्लापाचे पलायन…

यापूर्वी रामचंद्रम यल्लापा हा 23 सप्टेंबर 2020 रोजी तो कारागृहातून पळाला होता. मागील पाच महिने हुलकावणी दिल्यानंतर गुन्हा शाखा व म्हापसा पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला बंगळुरु येथून अटक केली होती. जून 2019 मध्येसुद्धा त्याने पहिल्यांदा पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. 23 सप्टेंबर 2020 रोजी ज्यावेळी तो पळून गेला होता, तेव्हा कारागृहाची संरक्षक भिंत, तसेच गटावरील चेंबरवर त्याने 24 तास लपून काढले होते. त्याशिवाय त्याने वाळत घातलेले जेलगार्डचे कपडे चोरले होते व मुसळधार पावसाचा गैरफायदा घेत तो कारागृहाच्या मुख्य फाटकातून चालत पसार झाला होता. यावेळी पावसामुळे फाटकावरील कर्मचारी आतमध्ये बसले होते.

…आणि बेत फसला

कैदी रामचंद्रम यल्लाप्पा याने काही दिवसांपासून त्याला ठेवलेल्या खोलीतील भिंतीला भगदाड पाडण्याचे काम करीत होता. हे कुणालाच दिसणार नाही, याची काळजी त्याने घेतली होती. कारागृहातील कैद्यांना सकाळी थोडावेळ मोकळ्या हवेत सोडले जाते. मात्र, त्यावेळी रामचंद्रन हा बाहेर न जाता, खोलीत थांबून भिंतीला भगदाड पाडत होता. ही बाब गुरुवारी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आली. खोल्यांच्या तपासणीवेळी खोदकामाचा आवाज येत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे रामचंद्रनचा पळून जाण्याचा बेत फसला.

मोबाईलही लपवले होते

ऑक्टोबर 2019मध्ये कोलवाळ कारागृहात तुरुंग महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखील राखीव पोलीस दलाने मारलेल्या छाप्यात कैद्यांकडून 67 मोबाईल संच व एक किलो अंमलीपदार्थ, 200 विडीची पाकिटे जप्त केली होती. त्यावेळी कैद्यांजवळ मोबाइल संच, तंबाखू-चुन्याच्या पुड्या बाहेर पडल्या होत्या. काहींनी डायरीची पाने कोरून त्यात मोबाइल दडवून ठेवले होते.

शिक्षा भोगणारे कैदी –
जप्त मोबाईल 2

खटला सुरू असणारे कैदी –
जप्त मोबाईल 17
जप्त रक्कम – 2 लाख रुपये

खटला चालू असणारे कैदी
जप्त मोबाईल 13

खटला चालू असणारे कैदी
जप्त मोबाईल 26

जप्त रक्कम – 36 हजार
क्वारंटाईन ब्लॉक

येथे नवीन कैद्यांना ठेवले जाते.
जप्त मोबाईल 9

एनडीबीएस विभाग

येथे अमली पदार्थांशी संबंधित संशयित कैदी.
जप्त मोबाईल 7

कोरोना पॉझिटिव्ह ब्लॉक

12 ते 13 जण आहेत. या ब्लॉकवर छापा पडलेला नाही. सर्व ब्लॉकमध्ये छापा पडल्यानंतर मोबाईलसह चार्जर, हेड फोन तसेच गांजा, तंबाखू जप्त केलेले आहे.

सरकारकडून गंभीर दखल

मध्यंतरी अट्टल गुन्हेगार मयत टायगर अन्वर याचा कोलवाळ कारागृहातील टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. या प्रकारामुळे कारागृहातील सावळा-गोंधळ दिसून आलेला. या घटनेची सरकारकडून गंभीर दखल घेत याचा अहवाल मागविला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक सोबित सक्सेना यांनी कारागृह प्रशासनाला काही शिफारसी केल्या होत्या. ज्यात कारागृहातील मोबाईलसाठी असलेले चार्जिंग पॉईट काढणे, कारागृहात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापासून कठड्याची उंची वाढविणे आदींचा यात समावेश होता.

मेस विभागावर छापा का नाही?

मेस विभागात सर्वाधिक गोंधळ असल्याची चर्चा कारागृहात आहे. येथे चालणारा कारभार ‘अर्थ’पूर्ण चर्चेअंतीच चालतो, अशीही चर्चा आहे. चांगले हवे तसे जेवण हवे असल्यास ‘अर्थ’पूर्ण चर्चा भलतीच वधारते, असे बोलले जाते. त्यामुळे येथे छापा का पडला नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.

लेडी डॉन?

कारागृहात एक लेडी डॉन असल्याची चर्चा आहे. तिचे नाव काय असावे, याची ‘कल्पना’ न केलेली बरी. तिची आहे म्हणे दहशत. तिच्याकडून तीन मोबाईल जप्त केलेले आहेत. ती ज्या विभागात आहे तेथे आणखी चार मोबाईल मिळालेले आहेत.
हा मेसमध्ये कसा?

चिन्नू की छिन्नू नामक गुन्हेगार आहे. त्याला काही शारीरिक आजार आहेत. त्याला मेस विभागात काम देऊ नये, अशी वैद्यकीय तज्ज्ञांची शिफारस असल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. मग तो तेथे कसा असतो? असा प्रश्न कारागृहातील सूत्रे विचारतात.

कोलवाळच्या कारागृहात 26 जानेवारी रोजी छापेमारी झालेली नाही. दर आठवड्याला कैद्यांच्या कक्षांची नियमित तपासणी होते. नव्याने रुजू झालेले गौरीश कुट्टीकर हे अधीक्षक ध्वज फडकावण्याच्या कार्यक्रमानिमित्ताने तेथे होते. त्यांनी तपासणी केली त्यात काही सापडले नाही.

वेनानसिओ फुर्तादो,
कारागृह महानिरीक्षक

कारागृहातील कक्षांची दर आठवड्याला तपासणी करावी, असा आदेश मी दिला आहे. त्यानुसार आज तपासणी सुरू होती. तेथे असल्याने त्या तपासणीवेळी उपस्थित राहीलो. तपासणीदरम्यान काहीच आक्षेपार्ह सापडले नाही. तरीही ही माहिती बाहेर कशी समजली, याचे आश्चर्य आहे.

गौरीश कुट्टीकर, कारागृह अधीक्षक

Back to top button