

वाळपई : होंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारखण-पिसुर्ले भागात होंडा पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा काही इसमांकडून दीड किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी होंडा येथील एकाला ताब्यात घेतले आहे. छाप्यानंतर बर्याच तासांनी पोलिसांनी या संदर्भातील गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभारखण, पिसुर्ले या ठिकाणी गांजा विक्रीसाठी आलेला संशयित अभय गावकर (23 वर्षे, रा. होंडा) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभारखण येथील नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपी अभय गावकर याचे वाळपई होंडा मार्गावर वडदेव येथील प्रमुख रस्त्याच्या बाजूला बार व रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी गांजाची तस्करी होत असल्याच्या तक्रारी लोकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. यापूर्वी संशयिताला यापूर्वी अनेकदा ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक झालेली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
होंडा, वाळपई, जुने गोवे पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी अशाच एका प्रकरणात त्याला सहा महिन्यांची कोठडी न्यायालयाने सुनावली होती. पोलिसांनी संशयिताने ड्रग्ज तस्करीसाठी वापरलेली चारचाकी ताब्यात घेतली आहे.