

पणजी; गायत्री हळर्णकर : राज्यातील पारंपरिक वस्त्र म्हणून ओळख असणार्या कुणबी साडीला वाढती मागणी आहे. मात्र, निर्मिती मर्यादित असल्यामुळे मागणीच्या प्रमाणात पुरवठा करणे अशक्य झाल्याची माहिती हस्तकला, कापड खात्यातील उद्योजकांनी दिली आहे.
'स्वयंपूर्ण गोवा' कार्यक्रमांतर्गत कुणबी साडी पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणबी शाल, स्कार्फ, ओढणी असे नवीन प्रकार बाजारपेठेत दाखल होत आहेत.
राज्यात सद्यस्थितीत एका हातमागावर 8 ते 12 दिवसांत एक कुणबी साडी विणून तयार होते. महिन्याभरात केवळ 2-3 साड्याच विणल्या जातात. राज्यात एकूण 50 कारागीर कार्यरत आहेत. विविध ठिकाणी सरकारी शाळांच्या किंवा इतर इमारतीत हे हातमाग बसविण्यात आले आहेत. हे सर्व कारागीर नवीन आहेत. त्यामुळे त्यांचा वेग खूपच कमी असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.
एका कुणबी साडीला 2 हजार 500 रुपये दर मिळतो. अनेक ठिकाणांहून या साडीला मागणी आहे. मात्र दरमहा तयार होणार्या 2-3 साड्यांमुळे या किमतीत साडी विकणे परवडत नाही. मधल्या काळात या साड्यांची निर्मिती पूर्णतः बंद होती. पारंपरिक कारागिरांना नव्याने प्रशिक्षण घेणार्या कारागिरांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते. तरुणांनाही मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. यात कोरगाव, मांद्रे, केरी-सत्तरी, सडा-वास्को, वेळगे, फोंडा, शिरोडा येथे प्रत्येकी एक तर अस्नोडा, सुर्ला येथे प्रत्येकी दोन हातमाग आहेत. या सर्व हातमागांवर 50 कारागीर काम करतात. या सर्व ठिकाणी तरुण प्रशिक्षणासाठी जातात. केरी येथे सर्वाधिक 100 तरुण प्रशिक्षण घेत आहेत. सर्व ठिकाणी मिळून सुमारे 500 तरुण सध्या कुणबी साडीचे विणकाम शिकत आहेत.
हातमागावर कापड विणण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व जमातींतील युवकांना महिन्याला 1,500 व इतर प्रवर्गांतील युवकांना 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. हातमाग घेण्यासाठी केंद्र सरकारकडून 30 टक्के अनुदान दिले जाते. नाबार्डतर्फे 'ऑफ फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशन' (ओएफपीओ) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून हातमाग कारागिरांसाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. तसेच मुद्रा कर्ज घेण्याची सोय आहे, अशी माहिती सरकारी अधिकार्याने दिली.