.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या यथासांग प्रतिष्ठापनेनंतर आता गौराई येण्याची प्रतीक्षा संपणार असून आज थाटामाटात गौराईचे आगमन होणार आहे. 'ये गं गौराई ये'... असं म्हणत झिम्मा फुगडीच्या तालात गौराईचे स्वागत करण्यासाठी महिलांमध्ये कमालीचा उत्साह आहे. गौराईच्या नैवेद्याला मिक्स पालेभाजी, भाकरी आणि पाटवडी असा नैवेद्य दाखवून तो शेजारी गौरीची शिदोरी म्हणून वाटला जाणार आहे.
गौरी आवाहनासाठी मंगळवारी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे; तर दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहू काळ आहे. शुभ मुहूर्त काळात गौरी घेण्यासाठी महिलांनी तयारी केली आहे.
शिवाच्या शक्तीचे आणि श्रीगणेशाच्या आईचे रुप म्हणून ओळखले जाणाऱ्या गौराई मातेचे अर्थात गौरीचे आगमन हा एक सोहळाच असतो. आज ज्येष्ठा गौरी घराघरांत पाऊल ठेवणार आहेत. गौरी येण्याच्या दिवशी प्रतीकात्मक गौरी म्हणून मुली, महिलांच्या हातात डहाळे ठेवलेला कलश दिला जातो. 'आली का गौराई... आले गं बाई, कशाच्या पायी... हळदी-कुंकवाच्या पायी' असं म्हणत गौराईचा घरात प्रवेश होतो आणि या गौरी सजवून उभ्या केल्या जातात. हा सारा सोहळा मंगळवारी घराघरांत साजरा होणार आहे.
महिला, युवती एकत्र येऊन गौरीगीते म्हणत नदी, तलाव, पाणवठे येथून गौरी आणण्याची प्रथा आहे. शहरातील रंकाळा, कोटीतीर्थ, लक्षतीर्थ तलावांसह पंचगंगा नदी येथे गौरी आणण्यासाठी महिलांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलिस विभागाच्या वतीने सुविधा व सुरक्षा यंत्रणा राबवण्यात येणार आहे. नदीघाटावर सुरक्षेसाठी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गौरीच्या स्वागतासाठी समस्त महिला भगिनींची लगबग सुरू असून बुधवारी मातेचे विधीवत पूजन केले जाणार आहे. गौरी पूजनादिवशी सुहासिनी ओवसा भरणार आहेत, तर नवीन लग्न झालेली दाम्पत्ये गौरी मातेसमोर वसा घेणार आहेत. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथीला गौरीचे आगमन होते. यंदा हे आगमन आज मंगळवारी होत आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी सोमवारी रात्री रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होणार आहे. मंगळवारी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे तिथीनूसार गौराईचे आगमन आज थाटामाटात होणार आहे.