

परळी वैजनाथ: अवर्षणामुळे परळी तालुक्यातील जल साठ्यांवर मोठा परिणाम झाला असून, यंदाच्या गणेश विसर्जनासाठी पारंपरिक हरिहर तीर्थाचा पर्याय बदलण्याची वेळ आली आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरातील हरिहर तीर्थ कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत जपण्याच्या दृष्टीने येथे कृत्रिमरीत्या पाणी सोडण्याऐवजी चांदापूर तलावाचा विसर्जनासाठी पर्याय म्हणून वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील गणपतींचे आता चांदापूर तलावात विसर्जन करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून परळी परिसरात पावसाअभावी जलसाठ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. शहरातील गणेश विसर्जनाचे पारंपरिक ठिकाण असलेले हरिहर तीर्थही यामुळे कोरडे पडले आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी कृत्रिमरीत्या पाणी सोडण्याची व्यवस्था पूर्वीपासून असली तरी सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा साठा संरक्षित करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हरिहर तीर्थात पाणी सोडण्याऐवजी अन्य जलस्रोतांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, नगर अभियंता ढवळे, शंकर साळवे आदींनी हरिहर तीर्थासह चांदापूर तलाव आणि शहरालगतच्या अन्य जलस्रोतांची पाहणी केली.तसेच गणेश विसर्जनबाबत आवश्यक त्या सेवा सुविधा याबाबतच्या नियोजनासंदर्भात चर्चा केली. गणेश विसर्जनाच्या नियोजनासाठी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
चांदापूर तलावात विसर्जनाची व्यवस्था, सुरक्षितता, वाहतूक तसेच प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी प्रशासनाकडून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.बैठकीस तहसीलदार विनोद रणवरे, नायब तहसीलदार पंडित सुरवसे, परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण, परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश विसर्जन चांदापूर तलावात होणार
गणेश विसर्जनाचा पारंपरिक सोहळा यंदा अवर्षणाच्या पार्श्वभूमीवर पार पडत असून, पाणी बचत आणि सुरक्षितता या दोन्ही बाबींना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी चांदापूर तलावाची निवड केली आहे. विसर्जनाचा उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी व गणेशभक्तांनी या उत्सवात शांततेत आणि सुरक्षित वातावरणात सहभागी व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी केले आहे.
चार ठिकाणी होणार विसर्जनमूर्ती संकलन
गणेश विसर्जनाचा उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. घरगुती गणरायांचे विसर्जन करण्यासाठी नगर परिषदेमार्फत शहरात प्रमुख चार ठिकाणांवर विसर्जनमूर्ती संकलन करण्यासाठी वाहन सुविधाकेंद्र नियोजित करण्यात आली आहेत. या ठिकाणाहून विसर्जनमूर्ती संकलन करुन चांदापूर येथील तलावात विसर्जन करण्यात येणार आहेत.