

शिरोली पुलाची : बाप्पा आगमन मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करून आवाज डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्याप्रकरणी मौजे वडगाव, शिरोली येथील संत रोहिदास प्रतिष्ठान व श्रीराम मंडळ या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष सुदेश कांबरे, श्रेयस यादव उपाध्यक्ष श्रवण कांबरे, रितेश भोसले, खजिनदार अनिकेत माने, विक्रम यादव व सचिव अच्युत कांबरे, राहुल शेवाळ यांच्यासह वीस जणांवर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार (दि. १४) रोजी रात्री सुमारे आठच्या सुमारास शिरोली पोलिसांनी केली.
याबाबत पोलिस नाईक ऋषीकेश पाटील यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व सदस्य अशा वीस जणांनी ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर व वाद्यांच्या वापराबाबत पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमावली २००० अन्वये नोटीस दिली होती.
मात्र, मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात डीजे सिस्टिमवर हिंदी, मराठी, इंग्रजी गाणी वाजवून मानवी जीवित, आरोग्य व सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने ध्वनीप्रदूषण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.