

वॉशिंग्टन ः या आठवड्यात एक-दोन नव्हे तर तब्बल पाच लघुग्रह पृथ्वीच्या भेटीला येऊन गेले. त्यापैकी सर्वात मोठ्या आकाराचा लघुग्रह एखाद्या विमानाइतका होता तर सर्वात लहान लघुग्रह एखाद्या बसइतक्या आकाराचा होता. हे सर्व लघुग्रह सुरक्षित अंतरावरून पृथ्वीजवळून पुढे निघून गेले.
'नासा'च्या अस्टेरॉईड वॉच डेटाबेसच्या माहितीनुसार शुक्रवार (दि.8) आणि शनिवार (दि.9) या दोन दिवशी हे पाच लघुग्रह पृथ्वीजवळून गेले. त्यापैकी पहिल्या लघुग्रहाचे नाव '2023 आरजी' असे आहे. त्याची रुंदी केवळ 39 फूट इतकी होती. शुक्रवारी हा लघुग्रह पृथ्वीपासून 1.6 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून गेला. त्यानंतर याच दिवशी 88 फूट रुंदी असलेला '2023 आरएच' 82 फूट रुंदीचा '2023 क्यूसी 5' आणि 26 फूट रुंदी असलेला '2020 जीई' हे लघुग्रह पृथ्वीजवळून गेले. त्यावेळी त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर अनुक्रमे 1.6 दशलक्ष किलोमीटर, 4 दशलक्ष किलोमीटर, 5.7 दशलक्ष किलोमीटर इतके होते. शेवटी शनिवारी म्हणजेच 9 सप्टेंबरला 24 फूट रुंदीचा '2023 आरएल' हा लघुग्रह 7,55,000 किलोमीटर अंतरावरून पुढे निघून गेला.