ब्लॉग : इडली, तलवार आणि मी | पुढारी

ब्लॉग : इडली, तलवार आणि मी

नोकरीनिमित्त्य गेली पाच-सहा वर्षं बेळगांवला आहे. बेळगावांत अनेक व्यक्ती आणि वल्ली भेटल्या. अनेक गमतीदार प्रसंग अनुभवले. अशा अनेक प्रसंगांनी बेळगांवमधील नोकरी संस्मरणीय बनत चालली आहे. काहीतरी शिकायला मिळतंय हे त्याहून समाधान देणारं आहे. परवाचीच गोष्ट. बेळगावातल्या कचेरी रोडवरील एका अगदी छोट्या रेस्टोरंटमध्ये इडलीची ऑर्डर देऊन पेपर चाळत बसलो होतो. रोज इथंच ब्रेकफास्ट करायची सवय त्यामुळे त्यावेळेत तिथं येणारे बरेचसे चेहरे परिचयाचे झाले होते. म्हणजे ओळख अशी नाही, पण तोंडओळखीपुरते. माझ्या समोरच्या बाजूला एक पंचविशीतील तरुण, त्याच्या पलीकडच्या टेबलावर स्कार्फवंगुठीत एक सुबक ठेंगणी आणि रेस्टोरंटच्या मालकाच्या बाजूला थांबून शिरा खात त्याच्याशी गप्पा मारत एक साठीचा असेल असा कमालीचा अजागळ गृहस्थ असे एकूण पाच लोक होतो.

तो अजागळ गृहस्थ तसा रोज तिथे असतो आणि रोज वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो, अगदी ट्रम्पपासून वाटाळ नागराजपर्यंत आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपासून सीरिया, उत्तर कोरियातील परिस्थितीपर्यंत. त्याची प्रत्येक विषयांवर मतं असतात. तो चक्क ‘राजस्थान पत्रिका’ नावाचं हिंदी दैनिक देखील वाचतो. म्हणजे त्याला वाचण्यासाठी काहीही वर्ज्य नाही. प्रत्येक बातमी वाचून त्यावर मत मांडणे आणि तेही हिरिरीने, ही त्याची खासियत.  (त्याने रोजचे पेपर, अग्रलेख वाचणे आणि न्यूज चॅनेल्सच्या प्राईम टाइमच्या चर्चा बघणे काही दिवस बंद केले पाहिजेत नाहीतर केस हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे असं मला वाटून गेलं). नेहमी प्रमाणे बोलता बोलता ते महाशय एकदम  इतिहासात आणि पर्यायाने शिवाजी महाराजांपर्यंत पोचले आणि इकडे माझ्या समोरचा तो पंचविशीतील दाढीधारी तरुण एकदम सतर्क होत त्यांची बडबड ऐकू लागला.  मग काही वेळानंतर त्यानेही त्यात सक्रिय भाग घेतला, खात असलेलं उप्पीट संपल्याने त्याने शिरा ऑर्डर केला. तिकडे त्या गृहस्थाने अफजलखानाच्या पोटात वाघनखे खुपसली असतील नसतील इकडे मी इडलीमध्ये चमचा खुपसून वर्तमान सुरक्षित करायच्या प्रयत्नात लागलो.

“महाराजांची तलवार ६५ किलोची होती, उगाच नाय” तो तरुण उद्गारला.

“६५? कोण सांगितलं रे तुला?” कानडीमिश्रित मराठीत तो गृहस्थ विचारता झाला.

“मी शिवचरित्रात वाचलंय.” तरुण बोलला.

“कुठल्या शिवचरित्रात ?” गृहस्थ.

“कुठल्या म्हणजे??? शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रात” तरुण.

(मी इथे इडली आणि आवंढा एकदम गिळला)

“अरे..लेखक कोण सांग की..” गृहस्थ एकदम वीररसात.

“लेखक काय माझ्या लक्षात नाय बा” तो तरुण. सुबक ठेंगणीने माझ्याकडे एक कटाक्ष टाकल्यावर ठसका थांबला.असो. “साssवकार.. ६५ किलोचं तलवार कधी असतंय काssय वो?” त्या गृहस्थाने रेस्टोरंट मालकीची साक्ष घेतली, मालक त्यावेळी हळद , तिखट,मीठ वेग्रे तोळा-ग्रॅमचा हिशेब करत असल्याने त्याने या किलोच्या चर्चेत रस दाखवला नाही, ‘नरोवा कुंजरोवा’ स्टाईलने मान हलवली. मग तो तरुण माझ्याकडे वळला, ” साहेब तुमि सांगा वो ६५ किलोची तलवार होती की नाय?”

दोघांनी मला माझ्या मनाविरुद्ध न्यायाधीश केल्याने आता निर्णय किंवा निकाल देणे प्राप्त होते, मी इडलीचा शेवटचा घास संपवला, चहाची ऑर्डर दिली आणि बोललो, ” असू शकेल, पूर्वीचा काळ वेगळा होता..”

“क्काय तर सांगता बगा वो सायेब थुमी ..शिवाजी महाराजांचं फोटो-गिटो बघितलं कि नायी थुमी?

” गृहस्थ. “बघितलं कि सगळं फोटो बघितलं मी” मी कसाबसा बोललो.

“मग फोटोवरून काय वाटतं सांगा की” गृहस्थ. “मामा आता फोटो कशास मध्ये काढताय तुमि?” तरुण उगाचच अस्वस्थ होत बोलला.

“फोटोवरून महाराजांचं वजन बघ रे..मला सांग ६५ किलोची तलवार उचलून लढाई खेळायचं कसं रे?…काय वो सायेब? बरोबर किनाय?

मी काहीतरी उत्तर देणार तितक्यात ती स्कार्फावंगुठीत मुलगी बिल देतसी निघती झाली आणि त्या तरूणाचा आणि माझाही त्या चर्चेतील रस एकदम कमी झाला. पण या लढाईचा काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे हेही खरं होतं. मी मध्यममार्गी कायतरी बोलून विषय संपवायचा म्हणून, ” तलवार ६५ किलोची म्हणजे ढाल किमान ३५ एक किलोची तरी पाहिजे..मग शंभर किलो ओझं घेऊन लढणे तसे अवघड वाटते हल्लीच्या काळाचा विचार केला तर..त्याकाळात माणसं तशी ताकतीची होती त्यामुळे नाही पण म्हणता येणार नाही..पण ६५ किलो हे काहीतरी वेगळ्या अर्थाने शिवचरित्रात आलं असेल तलवारीबाबत.. तलवार हे त्याकाळी सर्वात महत्वाचं शस्त्र असल्याने तिचं पूजन करण्यासाठी किंवा तिचं महत्व अधोरेखित करण्यासाठी तशी एखादी तलवार महाराजांनी बनवून घेतली असेल..जसं सिहांसन ३२ मण सोन्याचं होतं त्याप्रकारे ..पूजनासाठीची तलवार असू शकते”

माझं हे मॅरेथॉन बोलणं ऐकून दोघांनाही पुढे काय बोलावं कळेना..मग त्या गृहस्थाने मालकास उद्देशून, ” शिरा बरा झालाय पण रवा वेवस्थित भाजला नाय वो सावकार” असं काहीतरी बोलून अस्वस्थता मोकळी केली तर इकडे तो तरुण “च्यात साखर लै घातल्यास गा मामा” म्हणत व्यक्त झाला. मी चहा संपवत, हल्ली इतिहास वर्तमानावर आपली सावली गडद करत चालला असल्याने आता शिवचरित्र वाचायचे तर नेमके कुणाचे वाचायचे याचा विचार करत ऑफिसच्या दिशेने कूच करू लागलो.

Tags :  Interesting Discretion, History,  Shivaji Maharaj,  Talwar Weight,Hotel 

Back to top button