भारत हा उत्सव म्हणून जीवन जगणार्यांचा देश. प्रत्येक गोष्टीत इश्वराचे रुप शोधून त्याची पूजा करणारा देश अशीच भारताची ओळख जगभर आहे. सृष्टीतील प्रत्येक सजीव, निर्जीवरुप पूजनीय आहे. सारे सणवार ही एक प्रतीके आहेत. समाजात जे- जे योग्य आहेत ते टिकले जावे आणि त्यातून एक सदृढ समाज दीर्घकाळ टिकावा म्हणून हे सण साजरे करण्यापाठीमागचा उद्देश असतो. सणांना आपल्या जीवनशैलीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्साहाने साजरे केले जातात. त्यापैकी एक सण म्हणजे 'वट पौर्णिमा' हा आहे.
प्रामुख्याने महाराष्ट्रात वट पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. यासाठी वटवृक्षाची, वडाच्या झाडाची पूजा व प्रार्थना करतात. आज वट पौर्णिमा यानिमित्त जाणून घेऊया वटवृक्षाबद्दल व वट पौर्णिमेविषयी….
वडाचे झाड एका तासाला देते ७१२ किलो प्राणवायू
एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला ७१२ किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता करणे. या झाडाला इतर झाडांच्या तुलनेत आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत- जास्त कार्बन वायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. हा वृक्ष विशाल असल्यामुळे शुद्ध हवा आणि सावली देतोच परंतु आकाशातून धावणाऱ्या ढगामधून पाणी खेचून आणण्याची ताकद या वृक्षात असते. त्यामुळे पाऊस पडण्यास मदत होते. उन्हाळ्यात या वृक्षामुळे हवेत आर्द्रता सोडली जाते त्यामुळे याच्या छायेत गारवा मिळतो.
वडाच्या झाडाचे औषधी गुणधर्म
वटवृक्ष हा अत्यंत औषधी आणि गुणकारी वृक्ष म्हणून ओळखला जातो. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो द्रवपदार्थ त्यातून निघतो त्याचा औषधामध्ये मलमासारखा उपयोग होतो. विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा भरुन करण्यासाठी याचा उपयोग होतो. अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखणार्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात. ताप कमी होण्यासाठी वडाच्या पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह कमी होतो. पोटात जंत झाल्यास पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देतात. आव, अतिसार यावर पारंब्या तांदळाच्या धुवनात वाटून त्यात ताक घालून देतात.
…म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात
पुराणकथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला 'तू वृक्ष होशील' असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला. महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले, तेव्हादेखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला 'अक्षयवट' म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात. नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात.
वट पौर्णिमेची पूजा
सौभाग्यचं प्रतीक मानले जाणारे हळदी-कुंकू आणि काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तेथे अर्पण करतात. फळांचा राजा आंबा हा तेथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवतात. पाच फळांचे पाच वाटे बनवतात. ते सुपामध्ये सजवतात आणि सुंदर रुमालाने तो झाकून घेतात. ते वाटे खाण्यासाठी लहान मुले पूजेच्या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात. तसेच दूध साखरेचा नैवेद्यही दाखवतात. त्यानंतर वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालतात आणि शेवटी त्या धाग्याची वडाच्या खोडाला गाठ मारतात.
वट पौर्णिमेची पुराण कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. त्याला सावित्री नावाची सुंदर आणि गुणी कन्या होती. सावित्री उपवर झाल्यावर पतीची निवड करण्याची परवानगी राजाने दिली. तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षच शिल्लक असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडताना त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला. यमराज तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पतीशिवाय कोणतेही तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात.
'वृक्ष लागवड' हीच आपल्यासाठी 'वट पौर्णिमा'
आधुनिकीकरणाच्या ओघात गावांचे आणि शहरांचे काँक्रिटीकरण झाल्याने वटवृक्षाचे अस्तित्व जवळपास संपत आले आहे. कुठेतरी दूरवर एखादा वटवृक्ष आढळतो आणि त्याची पूजा करण्यासाठी महिलांची रांगच- रांग लागते. तसेच केवळ फांद्या आणून त्यांची पूजा करण्याऐवजी जागोजागी वटवृक्षाची किंवा अन्य वृक्षाची लागवड केली तर त्याचा फायदा नक्कीच होईल. वटवृक्षाची किंवा वटफांदीची पूजा करणारी प्रत्येक महिला सात जन्मी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करते. या वट पौर्णिमाला फांदीऐवजी वटवृक्षांची लागवड केली तर सात जन्मी हाच नवरा मिळेल की नाही हे सांगता येणार नाही पण आपल्या पुढच्या पिढीला नक्की सावली देईल हे नक्की. त्यामुळे यावर्षीपासुन वट पौर्णिमाला एक निश्चिय करा की, एका वर्षात एक तरी झाड लावीन व ते जगवून निसर्गाचे सौंदर्य फुलवण्यात मदत करील. वाढत्या तापमानाचा विचार करता 'वृक्ष लागवड' हीच आपल्यासाठी 'वट पौर्णिमा' आहे.