घरच्या घरी बनवा ‘मावा मोदक’ | पुढारी

घरच्या घरी बनवा 'मावा मोदक'

मुंबई: पुढारी ऑनलाईन

बाप्पा यायला अवघे दोन दिवस बाकी राहिले आहे. त्यावेळी बाप्पाला गोडाचा नैवद्य काय द्यावा, असा प्रश्न नेहमी पडतो. कधी गोडाचा नैवद्य दाखवण्यासाठी दुकानातून पदार्थ आणले जातात. पण हेच पदार्थ घरी करण्यात एक वेगळीच मजा असते. उकडीचे मोदक हे सर्रास घरी बनवले जातात. पण खव्याचे म्हटले की, कसे बनवायचे असा प्रश्न पडतोच. त्याचे उत्तरही तयार आहे. असे बनवा घरच्या घरी ‘मावा मोदक’.

साहित्य:

१/२ कप खवा

१/२ कप साखर

२ ते ३ टेस्पून मिल्क पावडर

२ चिमटी वेलची पूड

कृती:

साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवा. त्यानंतर खवा मायक्रोवेव्हसेफ भांड्यात ठेवून १ मिनिट हाय पॉवरवर गरम करा. भांडे बाहेर काढून ४० ते ४५ सेकंद ढवळा. यामुळे आत कोंडली गेलेली वाफ बाहेर पडेल. परत ४५ ते ५० सेकंद मायक्रोवेव्ह करा. त्यानंतर भांडे बाहेर काढून ढवळा. खवा कोमटसर झाला कि पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून मिक्स करुन घ्या. मिश्रण व्यवस्थित आळले तर मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवावेत. मिश्रणाला जर मोदक होण्याइतपत घट्टपणा आला नसेल तर मिल्क पावडर घालून मिश्रण हाताने मळून घ्यावे.

टिप: खूप जास्त मळू नये,  नाहीतर गोळा तुपकट आणि चिकट होईल.

Back to top button