‘इंटरनेट युगातील करिअरच्या संधी व आव्हाने’ यावर मार्गदर्शन | पुढारी

‘इंटरनेट युगातील करिअरच्या संधी व आव्हाने’ यावर मार्गदर्शन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

21व्या शतकामध्ये संदेशवहनाचे सर्वात मोठे माध्यम म्हणून इंटरनेटचा वापर होतो आहे. माहितीचे आदान-प्रदान जलदगतीने, कमी वेळेत व सुलभतेने होण्यासाठी या माध्यमाचा वापर प्रभावी ठरत आहे. प्रत्येक क्षेत्रांमध्ये इंटरनेटच्या मदतीने नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या माध्यमातील करियरच्या संधी, व्यावसायिक फायदे कोणते हे सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने  ‘इंटरनेटच्या युगातील संधी व आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. इंटरनेट वापरासोबतच यातील सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबतही यावेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 

जागतिक इंटरनेट दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी (दि. 29) सायंकाळी 5 वाजल्यापासून दैनिक ‘पुढारी’च्या अधिकृत फेसबुक पेज (pudharionline) वरून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. 

कार्यक्रमात इंटरनेट युगाची संकल्पना व भविष्यातील संधी, इंटरनेटच्या जगात स्वत:चे व्यक्‍तिमत्त्व कसे विकसित करावे, उपलब्ध करियरच्या संधी, व्यावसायिक वृद्धीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर, शालेय स्तरावरील ई- लर्निंगची माध्यमे, सोशल मीडियाचा योग्य वापर, संरक्षण व बँकिंग क्षेत्रातील इंटरनेटचा वापर, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी लागणारी दक्षता, सायबर क्राईमची समस्या व उपाययोजना, इंटरनेट अ‍ॅडिक्शनची मानसिक समस्या व उपाय, कॉल ड्रॉपची समस्या यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. कार्यक्रमात उद्योजक, विद्यार्थी, डिजिटल मीडिया अभ्यासक यांनी  pudharionline फेसबुक पेजला लाईक करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Back to top button