

Clothe washing tips: पांढरे कपडे घालायला प्रत्येकालाच आवडतात, कारण ते एक वेगळाच रुबाब देतात. मात्र, अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा दोन-चार वेळा धुण्यावरच त्यांची चमक कमी होते आणि ते मळकट किंवा पिवळसर पडू लागतात.
अनेकदा आपल्याला वाटते की आपले वॉशिंग पावडर खराब आहे आणि आपण ती बदलून टाकतो. पण सत्य हे आहे की अडचण तुमच्या सर्फमध्ये नाही, तर कपडे धुण्याच्या पद्धतीत असते. जाणून घेऊया अशा ३ सामान्य चुकांबद्दल, ज्या सुधारून तुम्ही तुमच्या पांढऱ्या कपड्यांची चमक कायम टिकवून ठेवू शकता.
आपण गडद रंगाचे कपडे वेगळे करतो, पण पांढऱ्या कपड्यांसोबत हलक्या निळ्या, गुलाबी रंगाचे कपडे मशिनमध्ये टाकतो. जरी या कपड्यांतून रंग सुटत नसला, तरी त्यांचा हलका रंगही पाण्यामध्ये मिसळून पांढऱ्या कपड्यांच्या धाग्यांमध्ये शिरतो. याच कारणामुळे पांढरे कपडे हळूहळू आपला खरा रंग गमावून पिवळे दिसू लागतात. त्यामुळे पांढरे कपडे फक्त आणि फक्त पांढऱ्या कपड्यांसोबतच धुवायचे हा नियम बनवा.
अनेकदा आपल्याला वाटते की जास्त डिटर्जंट वापरल्याने कपडे अधिक स्वच्छ होतील, पण खरं तर, पांढऱ्या कपड्यांसाठी ही सर्वात मोठी चूक आहे. जास्त डिटर्जंट वापरल्यामुळे रसायनांचे अवशेष कापडावर चिकटून राहतात, जे पाण्याने पूर्णपणे धुतले जात नाहीत. जेव्हा हे अवशेष वाळवताना सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात, तेव्हा कापड पिवळसर पडू लागते. याशिवाय, कपडे अधिक पांढरे करण्याच्या नादात वारंवार ब्लीच वापरल्याने कापडाचे धागे कमकुवत होतात आणि कपडे पिवळसर पडतात.
कपडे लवकर धुवून व्हावेत म्हणून आपण अनेकदा मशिनमध्ये खूप जास्त कपडे भरतो. असे केल्यामुळे कपड्यांना मशिनमध्ये फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. जेव्हा कपडे एकमेकांवर नीट घासले जात नाहीत, तेव्हा त्यातील घाण पूर्णपणे निघत नाही आणि डिटर्जंटचे अवशेषही तसेच राहतात. ही उरलेली घाण आणि घाम पांढऱ्या कपड्यांचा पांढरेपणा पूर्णपणे नष्ट करू शकतात. कपड्यांना मुक्तपणे हालचाल करता येईल इतकी पुरेशी मोकळी जागा मशीनमध्ये नेहमी राहील याची खात्री करा.
पुढच्या वेळी पांढरे कपडे धुताना, पाण्यात अर्धा कप पांढरा व्हिनेगर किंवा थोडा बेकिंग सोडा घाला. यामुळे कपड्यांना चिकटलेले जुन्या डिटर्जंटचे अवशेष आणि घाण निघून जाण्यास मदत होते, ज्यामुळे तुमचे कपडे पुन्हा अगदी नवीन आणि स्वच्छ पांढरे दिसू लागतात.