कुटुंब कलह : अत्याचारी अबोला!

कुटुंब कलह : अत्याचारी अबोला!
crime
कुटुंब कलह : अत्याचारी अबोला! File photo
Published on
Updated on
डॉ. प्रदीप पाटील, काऊंसेलर आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट

ती माझ्याशी बोलत नाही... तिने माझ्याबरोबर बोलायचे बंद केले आहे... तो आता बोलतच नाही माझ्याबरोबर! अरे बोल ना... असं काय मी केलंय की, तू माझ्याशी बोलणं बंद केलं आहेस? अशी अनेक वाक्यं घराघरांतून उमटत असतात आणि अशावेळी त्या ठिकाणी ‘बोलणं थांबवून...’ समोरच्याला कब्जात ठेवण्याचा प्रयत्न चालू असतो किंवा त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न चालू असतो किंवा त्याला आपण किती दुखावलो गेलोय आणि अशा गोष्टी आपण चालू देणार नाही, हे दाखवून देण्याचा प्रयत्न चालू असतो.

भावनिक अत्याचार!

काहीही असो; पण अशा पद्धतीने ‘बोलणं बंद करणं’ हा प्रकार एकप्रकारचा भावनिक अत्याचार असतो. भावनेचा दुरुपयोग करणं असतं. दुसर्‍याला कंट्रोल करण्याच्या नादात आपण जेव्हा हे बोलणं बंद करण्याचं शस्त्र उगारतो तेव्हा खरं तर आपण आपल्यालाही त्रास करून घेत असतो! कारण, ज्याच्याशी किंवा ज्यांच्याशी बोलणं बंद केलेलं आहे, त्यांच्याविषयीचे विचार अखंड डोक्यामध्ये चालू राहतात आणि त्या व्यक्ती समोर आल्या तर आता कसे वागायचे याच्याविषयी आपण विचार करण्यात गुंतून पडतो. त्याचा परिणाम कामावर होतो.

मॅन्युप्युलेटिव्ह पनिशमेंट!

बोलणं बंद केल्यावर आपल्याला तीन गोष्टी साध्य करायच्या असतात. एक म्हणजे, आपल्याला दुःख झालेलं आहे किंवा आपण नाराज झालेले आहोत हे दाखवून देणे. दुसरं म्हणजे, आपण जे काही समोरचा वागला आहे ते खपवून घेणार नाही, असे दर्शविणे. तिसरं आपण आपला कोणताही अपमान सहन करणार नाही, असे आपल्या हालचाली व हावभावावरून सांगत राहणे. वास्तवात, या तिन्ही गोष्टी व्यवस्थितरीत्या शांतपणे हाताळण्याची कौशल्ये असतात; पण आपण ती सोडून ही जी पद्धत वापरतो ते मुद्दामहून शिक्षा द्यायची म्हणून वापरत असतो. याला मॅन्युप्युलेटिव्ह पनिशमेंट म्हणतात.

नात्यामध्ये दुरावा!

जेव्हा वारंवार बोलणे बंद होऊ लागते किंवा केले जाते, तेव्हा एक गंभीर समस्या उद्भवते. नाते हळूहळू संपू लागते. दोघेही एकमेकांविषयीचे चुकीचे विचार करू लागतात. त्यातून सुडाची भावना वाढीस लागते. ज्या लोकांचा स्वतःबद्दलचा आदर हा कमी असतो ते ही पद्धत वापरतात. ज्या लोकांची सहनशक्ती ही अत्यंत कमी असते ते ही पद्धत वापरतात. यातून घडते असे की, ज्याच्याशी बोलणे सोडलेले आहे ती व्यक्ती आपल्या आसपास असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करणे, तिच्या कोणत्याही हालचालींना प्रतिसाद न देणे, तिच्या बोलण्याला न ऐकल्यासारखे करणे आणि त्यांचे तिथे अस्तित्व आहे हेदेखील बघून न बघितल्यासारखे करणे. अशा जेव्हा क्लृप्त्या वापरल्या जातात, तेव्हा त्यातून दोघांनाही नाराजी, राग, मूड ऑफ होणे आणि नैराश्य जोरदारपणे येणे या गोष्टी वारंवार घडू लागतात. यातून आपल्याला नकार मिळालेला आहे या गोष्टीचा प्रचंड संताप डोक्यात शिजू लागतो आणि त्यातून गुन्हे घडतात. हिंसाचार घडतो. अत्यंत बेदरकारपणे नात्यांमध्ये मारहाण किंवा एकमेकांना संपवणे घडते.

अबोला आणि मानसिकता!

गप्प बसल्यामुळे किंवा अजिबात न बोलल्यामुळे खरोखरच काही फायदा होतो का? तर त्याचे उत्तर असे आहे की ‘नाही.’ खरे तर कोणताही प्रश्न शांतपणे बोलून आणि विवेकी विचार व्यक्त करून सोडवणे घडायला हवे. त्यासाठी बोलणे अत्यावश्यक असते; पण इथे बोलणेच जेव्हा संपते, तेव्हा नात्यांमध्ये कटुता आणि कडवटपणा निर्माण होतो; मग ते सासू-सुनेचे नाते असो, नवरा-बायकोचे असो, वडील-मुलगा असो, अगदीच कामाच्या ठिकाणी आपला सहकारी असो किंवा शेजारी, नातेवाईक असो. जेव्हा आपण न बोलण्याची पद्धत वापरतो, तेव्हा समोरची व्यक्ती न बोलल्यामुळे सुधारेल व समजून घेईल याची कोणतीही गॅरंटी देता येत नाही. कारण, त्या व्यक्तीची मानसिकता कशी आहे याच्यावर ते अवलंबून असते. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा झालेला असला, तरी सर्वच ठिकाणी तो होतो, असे नाही.

अबोला एक पॉवर स्ट्रगल!

न बोलणे हा एकप्रकारे इशारा असतो. त्यातून समोरचा त्या इशार्‍याला घाबरला तर त्याला तो धमकी समजतो आणि त्या धमकीच्या भीतीच्या छायेत तो वावरत असतो. ही छाया त्याला गुन्हा करण्यास प्रवृत्त करू शकते. बर्‍याच वेळा सासू आणि सून यांच्या भांडणात वर्चस्व कोणाचे किंवा कुटुंबावर नियंत्रण कोणाचे, यावरून मतभेद असतात. त्यातून जाणीवपूर्वक मुद्दामहून काही वागणे सुरू होते. त्यातील एक प्रकार म्हणजे बोलणे बंद करणे. थोडक्यात सांगायचे असे असते की, जर तुम्ही असे वागलात तर आम्ही तुम्हाला किंमत देणार नाही. हा एकप्रकारचा ‘पॉवर स्ट्रगल’ असतो. आपली शक्तिमानता सिद्ध करण्याच्या नादात कदाचित आपली ही पद्धत गुन्हा घडेपर्यंत जाऊ शकते हे ध्यानात जर घेतले नाही, तर कोणीतरी आत्महत्या करणे किंवा जिवंत जाळणे किंवा विष घालून मारणे अशाप्रकारचे असंख्य गुन्हे घडतात. हे टाळायचे असेल, तर आपण हे लक्षात ठेवलेले बरे की, शांत डोक्याने; पण व्यवस्थित बोलून प्रश्न सोडविणे. त्यासाठी सहनशीलता आपल्यामध्ये वाढवणे..!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news