

ज्येष्ठ वद्य अष्टमी. वारकरी संप्रदायाच्या धार्मिक इतिहासातील महापर्व. का बरे एवढे महत्त्व आहे या ज्येष्ठाच्या तिथीला. तर आज खळखळत्या इंद्रायणीचे पाणी पिऊन, सळसळत्या अजाण वृक्षाची पाने खाऊन सच्छिदानंदांच्या कंदातील ब्रह्मानंदाची साधना करणार्या आणि सार्या विश्वाचे आर्त आपल्या वाणीतून प्रकट करणार्या लोकसखा ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान लाखो वारकर्यांना बरोबर घेऊन होत आहे. पंढरीच्या वारीची परंपरा पंढरी इतकीच प्राचीन आहे. ज्याच्या उगमाबद्दल डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटले, ‘आषाढी-कार्तिकी वारीचा उगम श्री विठ्ठल अवताराच्या उगमबरोबरचा आहे.’ वारीला सकृत दर्शनी 1 हजार वर्षांची तरी ऐतिहासिक परंपरा लाभली. ज्ञानेश्वर माऊलीचे पंजोबा भक्त त्र्यंबक पंत व पुढे पिताश्री विठ्ठल पंत यांनी मनोभावे पंढरीची वारी केली. पुढे ज्ञानोबारायांनी याचा विस्तार करताना म्हटले होते -
माझ्या जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।
पुढे नारायण बाबांनी तुकोबारायांच्या पादुका गळ्यात घेऊन आळंदीला नेल्या व ज्ञानोबा-तुकोबांचा एकत्रित पालखी सोहळा सुरू केला. काही वर्षांनंतर हे दोन्ही सोहळे स्वतंत्र झाले. 1832 मध्ये हैबती बाबा आरफळकर यांनी ज्ञानोबा माऊलीच्या पालखी सोहळ्यास विशाल व राजसी स्वरूप दिले. या सोहळ्याबद्दल डॉ. भा. प. बहिरट यांनी म्हटले आहे, ‘प्रथम ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका गळ्यात घेऊन पंढरीला नेण्याची परंपरा हेती. पण, हैबती बाबांनी या सोहळ्याला लष्करी शिस्तीचे स्वरूप देण्याबरोबर या पादुकांना पालखीत घालून समारंभपूर्वक पंढरीला नेण्यासाठी हैबती बाबाबरोबर अंकलीच्या शितोळे सरकारनेही योगदान दिले.’ ही झाली ज्ञानोबा माऊलीच्या पालखी सोहळ्याची सांप्रदायिक परंपरा; परंतु ज्ञानोबा माऊलीचे व्यक्तिमत्त्व यापेक्षा एवढे विशाल आहे की, आत्मभान हरवलेल्या लक्षावधी स्त्री-पुरुषांचे आत्मभान जागे करण्याचे काम माऊलीच्या अमृतमय शब्दांनी केले.
याच आळंदी-आळंद आनंदाच्या कंदाने ज्ञानोबा रायांच्या कोवळ्या सुकुमार तरुणांच्या सुमधुर वाणीतून आध्यात्मिक लोकशाहीची पहाट निर्माण केली. खरे तर हे काम तत्कालीन शास्त्री, पंडित, संत महंतांचे होते; पण ते आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातील गढ्या सुरक्षित राखण्यात व्यस्त असताना ज्ञानदेवासारख्या उपेक्षितांनी हे कार्य केले. अवघ्या विश्वातील भक्तांना आपल्या भक्तिभावाच्या पदराखाली घेत दीनानाथ, भक्तवत्सल पांडुरंगाच्या भेटीला माऊली मार्गस्थ होते, तेव्हा सार्या बहुजनांच्या भक्तीला एक बळकट आधार मिळतो. म्हणून मला ज्ञानोबा माऊलीचा पालखी सोहळा आत्मजाणिवेच्या पहाटेचा पहिला किरण वाटतो, तर ज्ञानोबा सर्व सुखाचे लहरी वाटतात. ज्याचे वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणाले होते,
सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई आलंकापुरी
शिवपीठ हे जुणाट । ज्ञानाबाई तेथे मुकुट
ज्ञानाबाईच्या चरणी । शरण एका जनार्दनी ॥ (क्रमश:)
- प्रा. शिवाजीराव भुकेले,