

आजकाल प्रत्येक स्मार्टफोनवर टेम्पर्ड ग्लास (Tempered Glass) लावलेला दिसतो. आपल्याला वाटते की यामुळे आपल्या फोनची महागडी स्क्रीन तुटण्यापासून वाचेल, पण हे पूर्णपणे सत्य नाही. प्रत्येक टेम्पर्ड ग्लास आपल्या स्क्रीनला पूर्ण संरक्षण देऊ शकत नाही. अनेकदा फोन पडल्यावर टेम्पर्ड तुटतो, पण स्क्रीन सुरक्षित राहते. याउलट, काहीवेळा टेम्पर्डला साधा ओरखडाही येत नाही, पण आतली मूळ स्क्रीन मात्र क्रॅक होते. पण अनेकदा ज्या गोष्टीवर आपण भरवसा ठेवतो, तीच गोष्ट आपल्या फोनचे नुकसान करू शकते.
टेम्पर्ड ग्लासचा मुख्य उद्देश स्मार्टफोनच्या स्क्रीनला धक्का प्रतिरोधक (Shock-absorption) बनवणे हा आहे. जेव्हा फोन जमिनीवर पडतो किंवा त्याला मोठा झटका बसतो, तेव्हा तो आघात सर्वात आधी या टेम्पर्ड ग्लासद्वारे शोषून घेतला जातो. त्यामुळे मोबाईल स्क्रीनपर्यंत या झटक्याची तीव्रता पोहोचत नाही आणि ती सुरक्षित राहते, अशी त्याची रचना असते.
बाजारात अनेक दुकानदार तुम्हाला हातोडीने टेम्पर्ड ग्लास न तोडता दाखवतील आणि सांगतील की, ‘ही इतकी मजबूत आहे की ती तुटणारच नाही!’ पण ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते.
तुमच्या मोबाईलचे टेम्पर्ड ग्लास जर पडल्यानंतरही तसेच शाबूत राहिले, तर ही धोक्याची घंटा आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, खाली पडल्यामुळे आलेला संपूर्ण आणि मोठा आघात थेट तुमच्या फोनच्या मूळ स्क्रीनवर पोहोचला आहे. यामुळे, अंतर्गत स्क्रीनला तडे जाण्याची किंवा ती तुटण्याची शक्यता खूप जास्त वाढते. त्याउलट, पडल्यावर टेम्पर्ड ग्लास तुटली तर काळजी करू नका. कारण, टेम्पर्ड ग्लासला तडे जाणे, हे एक सकारात्मक लक्षण आहे. याचा अर्थ असा की, आघाताची मोबाईलच्या मूळ स्क्रीनवर न होता टेम्पर्ड ग्लासवर झाला आहे.
चुकीचे ग्लू/फिटिंग : जर टेम्पर्ड नीट चिकटलेला नसेल आणि गॅप असेल, तर पडल्यावरचा आघात थेट स्क्रीनपर्यंत पोहोचतो.
बबल्स : जर टेम्पर्ड चुकीच्या पद्धतीने लावल्यास त्यात राहिलेले लहान बबल्स देखील पडल्यावर स्क्रीनचे नुकसान करतात. अनेक लोक स्वस्त आणि कमकुवत टेम्पर्ड घेतात. काही ग्लास फक्त कडांवरून चिकटतात आणि मधला भाग न चिकटा राहतो. त्यात एअर राहते. हे दिसण्यास ठीक वाटले तरी, पडल्यावर संपूर्ण आघात थेट मूळ स्क्रीनवर होतो.
कर्व्ह्ड स्क्रीनची समस्या : ज्या फोनची स्क्रीन किंचित वक्र (Curved) असते, त्यांच्यासाठी साधारण ग्लास नीट बसतच नाही, ज्यामुळे सुरक्षा मिळत नाही.
फोनची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, टेम्पर्ड ग्लासची निवड करताना खालील गोष्टी लक्षात घ्या :
फोन मॉडेलनुसार खरेदी : नेहमी आपल्या विशिष्ट फोन मॉडेलसाठीच बनवलेली ग्लास खरेदी करा. यामुळे फिटिंग अचूक होते.
जाडी : टेम्पर्ड ग्लासची जाडी साधारणपणे 0.3 मिमीच्या आसपास असावी. यामुळे ती आघात पेलू शकते आणि टच सेन्सिटिव्हिटी देखील चांगली राहते.
फुल ॲडेसिव्ह ग्लास : फक्त कडांवरून चिकटणाऱ्या ग्लासऐवजी, पूर्णपणे स्क्रीनला चिकटणारी टेम्पर्ड ग्लास घ्यावी. जेणेकरून मोबाईल पडल्यावर होणारा आघाता मूळ स्क्रीन पोहचू शकत नाही.
ओलेओफोबिक कोटिंग : ज्या ग्लासवर ही कोटिंग असते, त्यावर बोटांचे ठसे कमी दिसतात आणि स्क्रीन स्वच्छ राहते.
ब्रँडेड निवडा : थोडा महाग असला तरी, चांगल्या आणि ब्रँडेड कंपनीची टेम्पर्ड ग्लास नेहमीच जास्त सुरक्षित असते.