

मुंबई : जर तुम्ही मिडरेंज सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. पोकोने (Poco) भारतात आपला फ्लॅगशिप फोन Poco M8 Power लाँच केला आहे. खिशाला जास्त कात्री न लावता ज्यांना दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्स हवा आहे, अशा ग्राहकांना लक्षात घेऊन कंपनीने हा फोन बाजारात आणला आहे.
भारतात Poco M8 च्या पदार्पणानंतर आता कंपनीने आपल्या M-सीरिजचा विस्तार करत M8 Power चा समावेश केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील ८०००mAh क्षमतेची विशाल बॅटरी होय. याशिवाय फोनमध्ये ॲमोलेड (AMOLED) डिस्प्ले आणि क्वालकॉमचा (Qualcomm) अद्ययावत स्नॅपड्रॅगन (Snapdragon) चिपसेट देण्यात आला आहे.
डिस्प्ले आणि सुरक्षा : Poco M8 Power च्या फ्रंटला ६.९-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो १२०Hz रिफ्रेश रेट, १,८०० निट्स पीक ब्राईटनेस आणि ९६०Hz PWM डिमिंगला सपोर्ट करतो. हा पॅनेल १००% DCI-P3 कलर गॅमटला सपोर्ट करतो आणि त्यावर 'कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ७i' (Corning Gorilla Glass 7i) ची सुरक्षा देण्यात आली आहे. या उपकरणाला IP65 रेटिंग मिळाले असून, ते धुळीपासून आणि पाण्याच्या तुषारांपासून सुरक्षित राहते.
प्रोसिसर आणि सॉफ्टवेअर : या डिव्हाइसमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 4 Gen 4 प्रोससर बसवण्यात आला असून LPDDR4X रॅम (RAM) आणि UFS 2.2 स्टोरेज दिले आहे. हा फोन Android 16 वर आधारित HyperOS 3 वर चालतो. कंपनीच्या दाव्यानुसार, या फोनला चार वर्षांचे Android OS अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा पॅच (Security Patches) मिळतील.
बॅटरी आणि चार्जिंग : या फोनला ऊर्जा देण्यासाठी ८०००mAh ची भव्य बॅटरी देण्यात आली आहे. सलग २८ तास व्हिडिओ प्लेबॅक देण्यास ही बॅटरी सक्षम असल्याचा दावा चीनी कंपनीने केला आहे. हे उपकरण ४५W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि २२.५W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा आणि फीचर्स : कॅमेऱ्याचा विचार केल्यास, Poco M8 Power मध्ये ५०MP चा प्राथमिक रिअर कॅमेरा आणि ८MP चा फ्रंट कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरे ३०fps वर १०८०p व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. याव्यतिरिक्त, यात 'सर्कल टू सर्च' (Circle to Search), IR ब्लास्टर आणि अनेक AI-आधारित सॉफ्टवेअर टूलचा समावेश आहे.
डिझाइन आणि वजन : पोकोने या फोनला एक वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या मागील बाजूस (Rear Panel) फुल-विड्थ कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये दोन गोलाकार कॅमेरा कटआऊट मिळतात. याच मॉड्यूलच्या आत पोकोचे ब्रँडिंग आहे. फोनला फ्लॅट प्लास्टिक फ्रेम आणि प्लास्टिक बॅक आहे. याची जाडी ८.४ मिमी पेक्षा थोडी जास्त असून वजन सुमारे २२० ग्रॅम आहे.
भारतातील किंमत, ऑफर्स आणि उपलब्धता : Poco M8 Power च्या ६GB + १२८GB व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ₹२४,९९९ आहे, तर ८GB + १२८GB मॉडेलची किंमत ₹२७,९९९ निश्चित करण्यात आली आहे. कंपनी या नवीन डिव्हाइसवर ₹३,००० पर्यंतची बँक सवलत (Bank Discount) देखील देत आहे. भारतात हा स्मार्टफोन ७ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.