

नवी दिल्ली: बीएसएनएल (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. कंपनीने २७ सप्टेंबर २०२५ पासून देशभरात ४जी (4G) सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्या ग्राहकांनी खासगी कंपन्यांच्या महागड्या दरांमुळे बीएसएनएलकडे मोर्चा वळवला होता, त्यांच्यासाठी हा निर्णय खूपच फायदेशीर ठरणार आहे.
संपूर्ण देश ज्या तारखेची वाट पाहत होता, ती अखेर समोर आली आहे. बीएसएनएलने संपूर्ण देशभरात 4G मोबाइल नेटवर्क कधी सुरू करणार, याची घोषणा केली आहे. यासाठी आता ग्राहकांना आता जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही.
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने स्पष्ट केले आहे की, ते शनिवारी २७ सप्टेंबर २०२५ पासून देशभरात 4G सेवा सुरू करत आहेत. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या वर्षी रिचार्ज प्लॅनचे दर वाढवल्यानंतर जे ग्राहक बीएसएनएलकडे आले होते, त्यांना याचा मोठा फायदा होईल. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. भारत डिजिटल इन्फ्रा समिट २०२५ मध्ये बोलताना रवी म्हणाले, "हे आमचे स्वदेशी तंत्रज्ञान आहे, ज्याचे उद्घाटन आम्ही २७ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात करत आहोत." यामुळे बीएसएनएलच्या ९ कोटींहून अधिक वायरलेस सबस्क्राइबर्सना फायदा होईल. कंपनी लवकरच ५जी (5G) मोबाइल नेटवर्कही रोलआउट करेल अशी अपेक्षा आहे.
यापूर्वी, टेलिकॉम कंपनीने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत भारतभर एक लाख साइट्सवर ४जी सुरू करण्याची घोषणा केली होती, पण ते शक्य झाले नाही. माहितीनुसार, कर्जबाजारी असलेल्या या टेलिकॉम कंपनीला तंत्रज्ञानाच्या बाबतीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) नेतृत्वाखालील कन्सोर्टियम (Tejas Networks आणि C-DOT सह) मदत करत आहे. सरकारने मदत पॅकेजद्वारे या कंपनीला ४जी स्पेक्ट्रमचे वाटप केले होते.
७०० मेगाहर्ट्ज बँडवर ४जी सेवा देणारी बीएसएनएल ही देशातील एकमेव टेलिकॉम कंपनी असेल. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतेच बीएसएनएलला सांगितले होते की, त्यांचा एआरपीयू (ARPU) पुढील एका वर्षात ५०% आणि एंटरप्राइज बिझनेस २५-३०% वाढला पाहिजे. आता २७ सप्टेंबरपासून सर्व ग्राहक बीएसएनएलचे ४जी नेटवर्क वापरू शकतील का आणि त्यांना किती स्पीड मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.