

गेल्या पावणेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामध्ये सुरुवातीला आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे रशियाचे गोपनीय संदेश चोरण्यासाठी ए.आय.चा वापर झाला होता. आता दोन्ही देश थेट रोबो सैनिक तैनात करण्याच्या तयारीत आहेत. नेदरलँडमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका संमेलनात 80 पेक्षा अधिक देशांनी सैन्य मोहिमांत रोबोच्या वापरासंदर्भात चर्चा केली. त्यापैकी 60 देशांनी युद्धाच्या मैदानात ए.आय.चा वापर करण्याचा आग्रह केला. आगामी काळात नक्कीच ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सयुक्त रोबो हे युद्धभूमीच्या केंद्रस्थानी असतील.
जमितीला प्रचलित असलेल्या संगणकीय स्फोटाच्या काळात, गोळा केलेल्या माहितीच्या पृथक्करणासाठी विश्लेषकांना अनेक नवीन प्रणाली उपलब्ध होत आहेत. मात्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उदय झाल्यापासून त्यामधील धोकेही त्याच प्रमाणात वाढत आहेत. रशिया-युक्रेन युद्धात ‘प्राईमर’ या अमेरिकन कंपनीने युक्रेनच्या आर्टिलरी फायरखाली आलेल्या काही रशियन सैनिकांचे, सोशल मीडियावर प्रचंड गाजलेले उघड वेव्हलेन्थमधील रेडिओ संभाषण पकडले होते. प्राइमर कंपनी माहिती पृथक्करणासाठी आपल्या ग्राहकांना सर्वंकष सेवा पुरवतेे. त्यांनी टिपलेले सर्व संभाषण आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीद्वारे पकडले गेले आणि आपोआप रशियन भाषेत छापले जाऊन लागलीच त्याचे इंग्रजीत भाषांतर होऊन सत्वर पृथक्करणही झाले. हे संभाषण युक्रेन सेनेने ऐकले की नाही हे स्पष्ट नसले, तरी अमेरिका व नाटो राष्ट्रे ज्या पद्धतीने आणि वेगाने युक्रेन युद्धातील रशियन रेडिओ संभाषण पकडून कारवाया करताना दिसले, त्यावरून सांप्रत युद्धपद्धतीतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व अधोरेखित झाले.
गेल्या दशकात मिळालेल्या प्रशिक्षण विदेच्या पृथक्करणातून प्रतिमा संशोधन (इमेज रेकग्निशन), बोल उतारा (स्पीच टान्सक्रिप्शन), अनुवाद (ट्रान्सलेशन) आणि भाषा प्रक्रिया (लँग्वेज प्रोसेसिंग) या संकल्पनांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. या प्रगतीमागे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम प्रणालीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. शत्रूपाशी असलेल्या सांख्यिक आणि दूरवर, जबरदस्त मारा करणार्या हत्यारांचा सामना करण्यासाठी तसेच त्याला तोंड देण्यासाठी लढणार्या लष्करासाठी संभाषण, स्मार्टफोन व्हिडीओ क्लिप्स, सोशल मीडिया पोस्टस आणि फोटोंचे त्वरित पृथक्करण गेमचेंजर ठरणारे आहे. शत्रू दमनासाठी रशियाने युक्रेनमध्ये रणगाडे, क्षेपणास्त्रे आदींचा वापर केला; पण अमेरिका आणि ‘नाटो’ राष्ट्रांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कास धरली.
गेल्या पावणेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामध्ये आता ए.आय.चा पुढचा अध्याय लिहिला जात आहे. रशियाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी आता युक्रेनकडून दहा हजार रोबो तैनात केले जात आहेत आणि रशियादेखील यादृष्टीने पावले टाकत आहे. ब्रिटनच्या मते, संघर्ष असाच सुरूच राहिला, तर त्यांचे मनुष्यबळ सहा महिन्यांत संपेल. त्यामुळे आता तेथे मशिनधारी सैनिकांचा समावेश करावा लागेल. ही स्थिती भविष्यातील युद्धाच्या स्वरूपाचा कायापालट करणारी आहे. परिणामी, आगामी काळात संघर्ष हा मानव आणि रोबो सैनिकांत होताना दिसू शकतो. केवळ रशिया आणि युक्रेनमध्येच नाही तर जगभरातील लष्करात ए.आय. प्रणालीवर आधारित रोबो, युद्धासाठी वापरले जाणारे ड्रोन किंवा रोबो खेचर यासारखी उपकरणे कोणत्या ना कोणत्या रूपातून काम करत असून, त्यातही स्पर्धाही वाढत आहे. परिणामी, बाजारही वाढेल.
युके्रनने सैन्य भरतीचे किमान वय हे 25 वरून 18 वर आणले आहे. वयोमर्यादा कमी करूनही सैनिकांची कमतरता भासत आहे आणि त्यामुळे सीमेवर रोबो तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियादेखील सैनिकांच्या अपुर्या संख्येचा सामना करत आहे आणि त्यानेदेखील रोबोसारखेच तंत्र वापरण्याचे संकेत दिले आहेत. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या संघर्षात प्रचंड जीवितहानी झाली असून, सैनिकांनाही आता थकवा जाणवत आहे. साहजिकच दोन्ही बाजू आता माणसाऐवजी मशिन वापरण्याचे निश्चित करत आहेत. ही गोष्ट स्वाभाविक आहे. कारण शेवटी शस्त्रांची तातडीने निर्मिती केली जाऊ शकते किंवा अन्य राष्ट्रांतून ती खरेदीदेखील करता येऊ शकतात. परंतु, कुशल आणि प्रशिक्षित सैनिकांची तातडीने उपलब्धता करणे शक्य नाही. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे विकसित करण्यात आलेले मशिनरी रूपातील सैनिक गरजेचे ठरतात.
आणखी एक गोष्ट म्हणजे एखादे सैन्य देशाच्या विविध भागात विविध बाजूच्या आघाडीवर लढत असेल, तर अशावेळी तत्काळ गरज भागविण्यासाठी रोबा सैनिकांवर अवलंबून राहणे स्वाभाविक आहे. तसेच आधुनिक युद्ध प्रणालीत समोरासमोर लढण्याऐवजी दूर ठिकाणी बसून सायबर, डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून युद्ध तंत्राचा वापर केला जात असेल, तर वित्त, मनुष्यहानी कमी करण्यासाठी रोबो तंत्राला प्राधान्य दिले जाईल. यामुळे युद्धाचे तंत्र आणि स्वरूप बदलेल.
नेदरलँडमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका संमेलनात 80 पेक्षा अधिक देशांनी सैन्य मोहिमांत रोबोच्या वापरासंदर्भात चर्चा केली. त्यापैकी 60 देशांनी युद्धाच्या मैदानात ए.आय.चा वापर करण्याचा आग्रह केला. आगामी काळात नक्कीच ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सयुक्त रोबो हे युद्धभूमीच्या केंद्रस्थानी असतील. यावर्षी प्रकाशित ‘स्टॉकहोम इंटरनॅशल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अहवालाच्या मते, गेल्या काही वर्षांत मिलिटरी रोबो बाजारात अभूतपूर्व तेजी दिसते. युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश सुमारे दोन दशलक्ष ड्रोन तयार करण्याची योजना आखत आहेत. एकट्या युक्रेनमध्ये 160 पेक्षा अधिक कंपन्या मानवविरहित जमिनीवरून चालणारे वाहने चालवत आहेत आणि ते युद्धाच्या काळात लष्करी साहित्य पुरवणे, जखमींना युद्धाच्या भूमीतून बाहेर काढणे, दुर्गम भागात शस्त्र पुरवठा करणे, दूरवरून मारा करण्यासाठी मशिनगनमध्ये स्फोटके भरण्याचे काम करणे, यासारख्या कामात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
जागतिक सैन्य रोबो बाजाराचा आकार 2024 मध्ये 24 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचलेला असताना दहा वर्षांनंतर 2034 मध्ये सुमारे सात टक्के दरवर्षी वाढीच्या दराने सुमारे 45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बाजारात सर्वाधिक वाटा अमेरिकेचा 50 टक्के असेल. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर आणि दीर्घकाळ युद्ध चालत असेल, तर अमेरिकेचा बाजार आणखीच बहरेल. अशावेळी रशिया आणि युक्रेनचे युद्ध हे आगामी काळातील भेसुर ठरण्याची शक्यता आहे. सध्या संक्रमणाचा काळ असून आधुनिक युद्धामध्ये संभाव्यरीत्या ए.आय. आणि रोबोचा होणारा वापर हा अधिक विध्वंसक अणि विनाशकारी करणारे राहू शकतो.
युक्रेन आणि रशियात सैनिक रोबोची होणारी नियुक्ती पाहता तो सैनिकांची मदत करणारा आहे, हे स्पष्ट होते. म्हणजेच लढण्याबरोबरच तो शस्त्र आणि रसद पुरवठा करणे किंवा शत्रूच्या सैनिकांची टेहेळणी करण्याचे कामदेखील करेल. आतापर्यंत जगभरात अनेक देशांनी सैन्याच्या मदतीसाठी तसेच हल्ला आणि निरीक्षण करण्यासाठी युद्धाच्या मैदानावर ए.आय.युक्त रोबो प्रणालीचा वापर केला आहे. यात ड्रोन, ग्राऊंड रोबो, इलेक्ट्रिक लढाऊ विमान आदी. सैनिक अधिकार्यांच्या मते, फ्रंटलाईनवर रोबो वापरल्याने त्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत. रशिया-युक्रेन युद्धातील प्रामुख्याने ड्रोनचा उल्लेख करता येईल. जगातील प्रमुख देशांत लष्करांचे वाढते आधुनिकीकरण कार्यक्रम पाहता गुंतवणूक आणि अर्थसाहाय्यात सैनिक रोबोला प्राधान्य दिले जात आहे. रोबोच्या आधुनिकीकरण प्रक्रियेनुसार त्याची क्षमता, तत्परता आणि संचलनात प्रभावशीलता राहावी यासाठी लक्ष दिले जात असून, यात रोबोतील किचकट अडचणी दूर करण्याचे काम केले जात आहे. यावरून सैनिक रोबो बाजाराची व्याप्ती लक्षात येते आणि लवकरच युद्धाच्या मैदानात, अन्य सैनिकी गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारच्या रोबोचा वापर केला जाऊ शकतो. या माध्यमातून विरोधकांच्या तंत्रज्ञानावर मात करण्याचा हेतू असेल. रोबो बाजारातील स्पर्धा एवढी तीव्र होईल की मानवी पातळीवर लढल्या जाणार्या युद्धात रोबो स्वत:चे अस्तित्व सिद्ध करेल आणि ते स्वत:च शस्त्र सांभाळत युद्ध करताना दिसेल. सीमेवर, फ्रंटलाईनवर मानवी गनरच्या ठिकाणी आपल्याला असा रोबो दिसेल, की त्याला दूरवरून एका स्क्रिनच्या माध्यमातून संचलित केले जाईल आणि तयारदेखील केले जाईल.
रोबो सैनिकांचे फायदे असताना रोबो आणि ड्रोनचा अवास्तव वापर हा जीवघेणा, जोखमीचा राहू शकतो. विरोधकांकडून ए.आय.चे नेटवर्क हॅक करून त्यात बदल करण्याचा धोका राहू शकतो. अशावेळी हॅकर्सकडून संवेदनशील माहिती चोरली जाऊ शकते आणि स्वत:च्या बाजूची हानी केली जाऊ शकते. हा आत्मघातीपणा ठरू शकतो. रोबो सैनिकाचा एक चुकीचा निर्णयदेखील दोन्ही देशाच्या तटस्थ भूमिकेला युद्धात परावतिर्र्त करू शकतो. एक आणखी समस्या म्हणजे तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा काही चुकीचे घडले, तर त्याची जबाबदारी कोणावर निश्चित करायची? मशिन की त्याला नियंत्रित करणारा व्यक्ती? शिवाय त्याचे फायदे आणि कमी खर्च पाहता आगामी काळात सैन्यात त्याची भरती मोठ्या प्रमाणात केली जाणार हे नक्की. एक कुशल सैन्याधिकारी डेटा आणि माहितीच्या आधारे सैनिकी रोबोने हल्ला करायचा की नाही याबाबत निर्णय घेईल, मात्र निकृष्ट दर्जाचे सेन्सर, ए.आय.चे दोषपूर्ण लॉजिक आणि अन्य काही मशिनमधील त्रुटी पाहिल्यास मनुष्याने कमांड देण्यापूर्वीच रोबो स्वत:च आत्मघातकी निर्णय घेऊ शकतो. मार्च 2020 मध्ये लीबियात यादवी युद्धाच्या काळात रसद पुरवणार्या क्वाडकॉप्टर ड्रोनने कोणतीही पूर्वसूचना न घेता त्याने स्वत:च्याच ट्रकमधील स्फोटक शोधले, त्याच्या धोक्याचे आकलन स्फोटाची कमांड दिली. यानुसार त्याने लीबियन नॅशनल आर्मीच्या ट्रकच्या एका मोठ्या ताफ्याला उडवून दिले. सर्वकाही मशिनच्या हातात गेले, तर तो मनुष्याला युद्धभूमीपासून बाजूला करण्यास वेळ लावणार नाही. परिणामी, भविष्यातील युद्ध रोबोतच लढले जातील आणि युद्धाची नैतिकता ही वेशीवर टांगली जाईल.
भारतीय लष्कराने रोबोटिक डॉग म्यूल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सयुक्त रोबो, लॉजिस्टिक्स ड्रोनसारखे लष्करी रोबो तयार केले आहेत. त्याचा वापर युद्धकाळात मदत करण्यासाठी, स्फोटके नष्ट करणे, गुप्त माहिती मिळवणे, माईन लाईन क्लिअरन्स, लॉजिस्टिक यासारख्या अनेक प्रकारच्ंया कामात केला जात आहे. चीन, पाकिस्तान आणि अलीकडच्या काळात बांगलादेश, म्यानमार यासारख्या अशांत देशांकडून असणारा संभाव्य धोका पाहता भारतासमोर असंख्य आव्हाने आहेत. त्यामुळे एकाचवेळी अनेक आघाड्यांवर भारताला सजगता आणि शस्त्रसज्जता बाळगावी लागत आहे. अशावेळी आगामी काळात ‘डीआरडीओ’ अँटीड्रोन गन माऊंट प्रणाली तयार करत आहे.