

एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आज जगावर कोणतीही उत्पादक कंपनी राज्य करीत नाही, तर जगभरातल्या वापरकर्त्यांचा डाटा सहजी हाताशी उपलब्ध असणार्या समाजमाध्यम कंपन्यांचे वर्चस्व सर्वदूर प्रस्थापित झाले आहे. यामध्ये गुगल, मेटा, एक्स, मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि अॅमेझॉन या कंपन्यांमध्ये त्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या वापरकर्त्यांच्या डाटावर अधिकार प्रस्थापित करून त्या डेटाच्या आधारे बाजारपेठेवरील आपापले वर्चस्व अबाधित राखण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे यातील प्रत्येक कंपनीने आपला संशोधन व विकास हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने केंद्रित केला आहे. जगातील आघाडीच्या समाजमाध्यम कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा किती प्रभावी आणि गतिमान वापर करीत आहेत, हे समजून घेतल्याखेरीज तिचा आवाका आपल्या लक्षात येणार नाही.
मेटा (पूर्वीची फेसबुक) ही जगातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने डिजिटल जगात क्रांती घडवून आणत आहे. मेटा ही केवळ एक सोशल मीडिया कंपनी न राहता, ए.आय.च्या मदतीने मेटाव्हर्स, डेटा विश्लेषण आणि वैयक्तिककृत अनुभव यांसारख्या क्षेत्रांत नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवत आहे.
मेटा तिच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप या समाज माध्यम प्लॅटफॉर्म्समध्ये ए.आय.चा वापर करतेच आहे, मात्र प्रामुख्याने नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या मेटाव्हर्स या संकल्पनेत खूप मोठ्या प्रमाणात वापरते आहे. याचा थेट परिणाम डिजिटल संवाद, डेटा व्यवस्थापन, आणि ग्राहक अनुभवावर होतो.
मेटाच्या समाज माध्यम प्लॅटफॉर्म्सवर कस्टमाईज्ड फीड, व्हिज्युअल आणि व्हॉईस रेकग्निशन, ट्रेंड विश्लेषण तसेच स्पॅम आणि गैरवर्तन नियंत्रण यासाठी ए.आय. वापरले जाते. मात्र, मेटाच्या व्हर्च्युअल रिअॅलिटीवर आधारित विश्व असलेल्या मेटाव्हर्सची संकल्पना विकसित करण्यासाठी ए.आय.चा उपयोग अनेक प्रकारे केला आहे. तिथे ए.आय.च्या मदतीने लोकांचे व्हर्च्युअल अवतार तयार केले जातात, जे मेटाव्हर्समध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करतात. मेटाव्हर्समधील आभासी जागांना (virtual spaces) ए.आय.च्या साहाय्याने अधिक संवादक्षम आणि स्मार्ट बनवले जाते. त्याचप्रमाणे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या साहाय्याने मेटाव्हर्समध्ये वापरकर्ते नैसर्गिक संवाद सहज साधू शकतात.
मेटाने फेअर (FAIR फेसबुक ए.आय. रिसर्च) या संशोधन केंद्राची स्थापना केली आहे, जिथे ए.आय.च्या प्रगत तंत्रज्ञानावर काम केले जाते. तेथे मेटाने जगातील दोनशेहून अधिक भाषांमध्ये भाषांतर करणारी ए.आय. यंत्रणा विकसित केली आहे. ए.आय.च्या मदतीने मेटा स्वयंचलित रोबोटिक्स प्रणालीही विकसित करत आहे. मेटाने विकसित केलेले पायटॉर्च (PyTorch) हे ए.आय. संशोधन आणि मशिन लर्निंगचे ओपन-सोर्स साधन आहे. शास्त्रज्ञ आणि डेव्हलपर यांच्यासाठी हे ए.आय. मॉडेल तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते. ए.आय.च्या मदतीने मेटा जनरेटिव्ह तंत्रज्ञान वापरत आहे, ज्यामध्ये स्वयंचलित इमेज आणि व्हिडीओ निर्मिती, थ्री-डी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी आधारित इमर्सिव्ह कंन्टेंट तयार केला जातो. थोडक्यात, मेटा ही आता फक्त समाज माध्यम कंपनी न राहता, ए.आय.च्या साहाय्याने मेटाव्हर्ससारख्या नव्या जगाची उभारणी करणारी बनली आहे. तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळे, ग्राहकांना अधिक चांगला अनुभव आणि व्यवसायांना वाढीची संधी मिळेल. मात्र, त्याचवेळी नैतिकता, डेटा गोपनीयता, आणि गैरवापर टाळण्यासाठी योग्य धोरणांची गरज आहे.
व्हॉट्स अॅप हे मेटाचे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वापरकर्त्यांसाठी संवाद अधिक सोपा, सुरक्षित आणि सानुकूल बनविण्याचा प्रयत्न करत आहे. मेसेजिंग अनुभवात सुधारणा, ऑटो-सजेशन (Smart Replies), टेक्स्ट प्रेडिक्शन, भाषांतर आणि बहुभाषिक समर्थन, रिअल टाईम भाषांतर, एंड-टू-एंड एनक्रिप्शन लागू करून वापरकर्त्यांच्या संदेशांची सुरक्षा आणि गोपनीयता, स्पॅम आणि फ्रॉड अलर्ट, फेक अकाऊंट्सचा शोध, व्हॉट्स अॅप बिझनेसमध्ये ए.आय.च्या साहाय्याने व्यवसायांसाठी सुलभ संवाद, चॅटबॉट्स सेवा, कस्टमाईज्ड अनुभव, मल्टिमीडिया सुविधा, स्पॅम मीडिया फिल्टर, मेसेज फिल्टरिंग, व्हाईस असिस्टंट इंटिग्रेशन, ए.आय.आधारित फॉरवर्ड लिमिट असे अनेक नवनवे फीचर मेटाने ए.आय.च्या साहाय्याने वापरकर्त्यांना प्रदान केले आहेत.
गुगल ही जगातील सर्वात प्रगत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. तिच्या यशामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा आहे. गुगलने ए.आय.चा वापर विविध सेवा सुधारण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक चांगले अनुभव देण्यासाठी केला आहे. गुगलच्या कोअर सर्च इंजिनमध्ये ए.आय.चा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. रँकब्रेन (RankBrain) हा गुगलच्या सर्च अल्गोरिदमचा ए.आय. आधारित भाग आहे, जो युजरच्या सर्च क्वेरीचा अर्थ समजावून घेऊन अचूक परिणाम शोधतो. गुगलने बर्ट (BERT -Bidirectional Encoder Representations from Transformance) या मॉडेलच्या आधारे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग पद्धती विकसित केली असल्याने गुगल सर्चला वापरकर्त्याच्या क्वेरीचा अधिक चांगला संदर्भ समजतो. ए.आय.मुळे वापरकर्त्याच्या शोध इतिहासावर आधारित अधिक वैयक्तिककृत परिणाम दाखवले जातात. गुगलची ट्रान्सलेट ही भाषांतर सेवा ए.आय. आणि मशिन लर्निंगवर आधारित आहे. ती शंभरहून अधिक भाषांचे अचूक आणि वेगवान भाषांतर करू शकते. न्यूरल मशिन ट्रान्सलेशनद्वारे भाषांतर अधिक सुसंगत बनते. टेक्स्ट, आवाज आणि प्रतिमांमधूनही भाषांतर करण्याची क्षमता गुगलने विकसित केली आहे.
गुगल असिस्टंट हा गुगलचा ए.आय.आधारित साहाय्यक स्मार्टफोन, स्मार्ट होम डिव्हाईसेससह विविध उपकरणांवर उपलब्ध आहे. व्हॉईस रेकग्निशन आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या मदतीने ते वापरकर्त्याच्या आदेशांचे अचूक पालन करते. वैयक्तिककृत सूचना, वेळापत्रक व्यवस्थापन आणि विविध माहिती शोधण्यास मदत करते. गुगलच्या सर्वच अॅप्समध्ये ए.आय.चा वापर करण्यात आला असून त्यांचे कार्य अधिक अचूक, प्रभावी व गतिमान करण्यात येत आहे.
गुगल फोटोज या अॅपमध्ये फोटो व्यवस्थापनासाठी ए.आय.चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ए.आय.चे अल्गोरिदम चेहर्यांची ओळख, वस्तू वर्गीकरण आणि फोटो टॅगिंगही करतात. ए.आय.आधारित टूल्स फोटो संपादनासाठी ऑटोमॅटिक सुधारणा आणि फिल्टर्स देतात. मेमरी फीचर हे वापरकर्त्याच्या जुन्या फोटोंमधील महत्त्वाचे क्षण ओळखून ते एकत्रित संकलित करते.
गुगलचे यूट्यूब हे व्हिडीओ कंन्टेंट सेवा पुरविणारे मंच आहे. येथे ए.आय. वापरकर्त्याच्या कंन्टेंट पाहण्याच्या सवयीचा अभ्यास करून कस्टमाईज्ड कंन्टेंटची शिफारस करते. स्पॅम नियंत्रण, अपमानास्पद किंवा अवांछित टिपण्या फिल्टर करणे, व्हिडीओचे स्वयंचलित ट्रान्सक्रिप्ट तयार करणे, इत्यादीसाठी ए.आय. उपयुक्त ठरते.
डीपमाईंड (Deep Mind) ही गुगलची ए.आय. संशोधन संस्था आहे. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी ए.आय.आधारित समाधान शोधण्याच्या कामी उपयुक्त ठरते आहे. विशेषतः ए.आय.च्या मदतीने कर्करोग, नेत्ररोग, आणि हृदयविकार ओळखणे सोपे झाले आहे. अल्फागो (Alpha Go) आणि अल्फाफोल्ड (Alpha Fold) यांसारखी अत्याधुनिक ए.आय.प्रणाली विकसित करणे ही कामे इथे केली जातात. त्याचप्रमाणे टेन्सरफ्लो (TensorFlow) हे गुगलने विकसित केलेले ए.आय. आणि मशिन लर्निंगसाठीचे ओपन-सोर्स सॉफ्टवेअर आहे. संशोधक आणि डेव्हलपर्स यांच्यासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे न्यूरल नेटवर्क्स तयार करण्यासाठीही ते प्रभावी साधन आहे.
गुगल-बार्ड हा गुगलचा जनरेटिव्ह ए.आय. प्रकल्प आहे, जो चॅटबॉटसाठी वापरला जातो. वापरकर्त्याच्या तो प्रश्नांना सर्जनशील आणि अचूक उत्तरे देतो. कंटेंट जनरेशन आणि संवाद व्यवस्थापनात उपयुक्त आहे. तसेच, गुगलने विकसित केलेले वेमो (Waymo) हे स्वयंचलित वाहनांसाठी उपयुक्त आहे. यात ए.आय.चा वापर वाहतूक नियंत्रण, मार्ग नियोजन आणि ड्रायव्हिंगविषयक निर्णय अधिक अचूक व सुरक्षित बनवले जातात. अशा प्रकारे ए.आय.च्या साहाय्याने गुगलने अक्षरशः क्रांती घडविली आहे.
अॅपल ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आपल्या उत्पादनांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी सातत्याने संशोधन व विकासात अग्रेसर राहिली आहे. आयफोन, आयपॅड, मॅकबुक यांसह आपल्या विविध सेवांमध्ये अॅपलने ए.आय.चा वापर करून डिजिटल जगात क्रांती घडवून आणली आहे.
सिरी हा अॅपलचा ए.आय.आधारित व्हाईस असिस्टंट असून जो वापरकर्त्यांना विविध कामे सोप्या पद्धतीने पार पाडण्यास मदत करतो. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर करून यूजरच्या बोलण्याचा अर्थ समजून त्याला अचूक उत्तर देतो. यूजरच्या सवयी, दिनचर्या आणि आवडीनुसार सेवा सादर करतो. आयफोन आणि आयपॅडसाठी अॅपलने चेहरा ओळखणारी अत्याधुनिक प्रणाली विकसित केली गेली आहे. फिंगरप्रिंट किंवा पासवर्डच्या तुलनेत ती अधिक सुरक्षितता प्रदान करते. वापरकर्त्याचे लक्ष ओळखून डिव्हाईस अनलॉक करता येते.
अॅपलच्या नवीन डिव्हाईससाठी खास तयार केलेल्या AI सिरीज (16 Bionic) आणि M²सिरीज (M1, M2) प्रोसेसर्समध्ये ए.आय. आणि मशिन लर्निंगचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. न्यूरल इंजिनमुळे ए.आय.आधारित कामे जसे की, फोटो प्रोसेसिंग, भाषा ओळख आणि आवाज विश्लेषण इ., जलद आणि प्रभावी होतात. वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अॅपल विशेष काम करते.
अॅपलच्या कॅमेरा प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. स्मार्ट एचडीआर फीचर प्रकाश, छायाचित्र आणि रंग अधिक नैसर्गिक बनवतो. डीप फ्यूजनमुळे कमी प्रकाशातही उच्च दर्जाचे फोटो घेणे शक्य होते. कंन्टेंट अवेअर एडिटिंगमुळे फोटोमधील अनावश्यक घटक काढून टाकणे किंवा त्यात बदल करणे सहजशक्य होते. अॅपल म्युझिक ए.आय.च्या साहाय्याने वापरकर्त्याला वैयक्तिककृत संगीत शिफारशी देते, आवडीनुसार प्लेलिस्ट तयार करते, संगीताचा प्रकार, मूड आणि वापरकर्त्याच्या ऐकण्याच्या सवयींचा अभ्यास करते.
अॅपलच्या विविध उपकरणांत आरोग्य आणि फिटनेस तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जातो. अॅपल वॉच आणि हेल्थ अॅपमध्ये ए.आय.चा वापर केला जातो. हृदयाचे ठोके ओळखून आरोग्यविषयक सूचना करणे, झोपेच्या सवयींवर आधारित वैयक्तिक आरोग्य सल्ला देणे, वापरकर्त्याचा अचानक पडण्याचा प्रसंग ओळखून मदतीसाठी संपर्क साधणे इत्यादी बाबी यामध्ये आहेत.
अॅपलच्या उत्पादनांसाठी वापरकर्त्याची गोपनीयता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी ऑन-डिव्हाईस प्रोसेसिंगसाठी ए.आय. वापरले जाते, ज्यामुळे वापरकर्त्याला डेटा इंटरनेटवर अपलोड करण्याची गरज उरत नाही. डेटा एनक्रिप्शनच्या मदतीने वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली जाते. त्याचप्रमाणे अॅपलने ए.आय.च्या मदतीने आयफोन, मॅकबुक, अॅपल वॉच आणि होमपॅडसारख्या डिव्हाईसअंतर्गत अखंडित संवाद साधणारी इकोसिस्टीम विकसित केल्याने एअरपॉड्स वापरताना कॉल आला, तर यापैकी कोणत्याही उपकरणावर तो सहजपणे स्वीकारता येतो.
(लेखक शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)