

जेफ्री हिंटन हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (ए.आय.) किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणूनच आज ओळखले जातात. या क्षेत्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या, पायाभूत स्वरूपाच्या कामाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे. जेफ्री हिंटन यांचा जन्म विद्याव्यासंगाची परंपरा असलेल्या घरात दि. 6 डिसेंबर 1947 या दिवशी लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील हॉवर्ड एव्हरेस्ट हिंटन हे एक नामवंत कीटकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. पण तेच नाहीत, तर जेफ्री हिंटन यांचे इतर नातेवाईकही बौद्धिक क्षेत्रातल्या कर्तबगारीबद्दल प्रसिद्ध होते. त्यांच्याकडं अगदी धावती नजर टाकली, तरी आपण चकित होतो. त्यांच्या नातलगांंमध्ये मेरी एव्हरेस्ट बुले आणि त्यांचे पती जॉर्ज बुले हे नामवंत गणिती आहेतच; पण चार्ल्स हॉवर्ड हिंटन हे प्रसिद्ध गणितीसुद्धा आहेत. जोन हिंटन यांनी प्रसिद्ध अशा ‘मॅनहटन प्रकल्पा’मध्ये (अण्वस्त्र बनविण्याचा प्रकल्प) काम केलं आहे. चार्ल्स हिंटन यांनी गणिताच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. जॉर्ज एव्हरेस्ट यांनी हिमालयातील एव्हरेस्ट पर्वताचा सखोल सर्व्हे केला. त्या कामामुळंच त्यांचं नाव त्या पर्वताला दिलं गेलं. बुद्धिमंतांच्या अशा मांदियाळीचा वारसाच जेफ्री हिंटन पुढं चालवत आहेत. ते आणि जॉन हॉपफिल्ड हे आधुनिक काळातील एका अद्भुत क्रांतीचे जन्मदाते आहेत.
जेफ्री हिंटन यांचं शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठात झालं. तिथं त्यांनी शरीरशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. मात्र, त्यांनी पदवी मिळवली, ती ‘एक्सपरिमेन्टल सायकॉलॉजी’ या विषयात! नंतर ते एडिनबरो विद्यापीठात गेले. तिथूंन त्यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (ए.आय.) या विषयामध्ये पीएच.डी. मिळवली. ते साल होतं, 1978! पीएच.डी. मिळविल्यानंतर त्यांनी कॉम्प्युटर नेटवर्क्सच्या संबंधात अभ्यास सुरू केला. कॉम्प्युटरची ही जाळी तयार करण्यासाठी न्यूरल नोडस्चा उपयोग करण्यात आला होता. ही न्यूरल नोडस् माणसाच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्याच्या रचनेप्रमाणंच करण्यात आली होती. अशा रीतीनं तयार करण्यात आलेल्या कॉम्प्युटरच्या नेटवर्कवर काम करण्याची कल्पना जेफ्री हिंटन यांच्या प्राध्यापकांना अजिबातच आवडली नव्हती. हे काम जेफ्री यांनी करू नये, असं त्यांच्या प्राध्यापकांचं म्हणणं होतं. पण जेफ्री यांनी आपल्या शिक्षकांचं हे म्हणणं मान्य केलं नाही. त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. पीएच.डी.नंतरचा हा अभ्यास (पोस्ट डॉक्टरल) त्यांनी अमेरिकेच्या सॅन दिअॅगोमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून पूर्ण केला. 1982मध्ये ते ‘कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटी’मध्ये दाखल झाले. तिथं त्यांनी मानसशास्त्रज्ञ डेव्हिड रुमेलहार्ट आणि कॉम्प्युटर शास्त्रज्ञ रोनाल्ड जे. विल्यम्स यांच्याबरोबर ‘अल्गोरिदम’ विकसित करण्याचं काम केलं. यातूनच ‘न्यूरल नेटवर्क’ विकसित करण्याचं काम सुरू झालं. ही गोष्ट आहे 1986 सालातली.
त्यानंतर हिंटन यांनी अमेरिका सोडली आणि ते कॅनडामध्ये आले. याचं कारण त्यावेळेस रोनाल्ड रेगन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीमध्ये ए.आय.वरील संशोधनासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून निधी पुरवला जात होता. परंतु, ए.आय.चा उपयोग युद्धजन्य कारणांसाठी करणं हिंटन यांना मान्य नव्हतं. त्यामुळं अमेरिका सोडून ते कॅनडात गेले. तिथं त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टोरँटोमध्ये संशोधनाचं काम सुरू केलं. न्यूरल नेटवर्क्स आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर यावर त्यांनी सखोल काम केलं. यातूनच ‘अलेक्सनेट’ या अधिक शक्तिशाली नेटवर्कची निर्मिती झाली. पुढं हिंटन ‘गुगल बे्रन’ या कंपनीत गेले. तिथं ते कंपनीच्या ए.आय. संशोधकांबरोबर काम करू लागले. ए.आय.मध्ये वापरण्यात येणारी न्यूरल नेटवर्क्स ही माणसाच्या मेंदूतील मज्जासंस्थेसारखी असतात. माणसाचा मेंदू हा अभ्यासातून आणि अनुभवांतून नवनवीन गोष्टी शिकतोच; पण मिळालेली माहिती साठवून ठेवतो. त्याचा वापर योग्य वेळी केला जातो. ए.आय.मध्ये वापरण्यात येणारी न्यूरल नेटवर्क्ससुद्धा ‘अनुभवांतून’ शिकत जातात. यालाच ‘डीप लर्निंग’ असं म्हणतात.
याचा अर्थ असा की माणसाचा मेंदू त्याच्याकडं जमा होणार्या विदावर (डेटा) प्रक्रिया करून शिकत जातो. तसंच ए.आय. नवीन विदावर प्रक्रिया करून कॉम्प्युटरला शिकवत राहतो. त्यामुळं कॉम्प्युटरला गुंतागुंतीची चित्रं, मजकूर, आवाज वगैरे ओळखता येतात, त्यांचा अर्थ लावता येतो. त्याचं विश्लेषण करून अचूक भविष्य व्यक्त करता येतं. एका अर्थानं, ए.आय.मुळं कॉम्प्युटरला ‘अद्भुत’तेचं वलयच मिळतं. म्हणूनच न्यूरल नेटवर्क्स विकसित करणं हे क्रांतिकारी काम आहे, असं हिंटन म्हणतात. ए.आय.मुळं आपल्या बौद्धिक क्षमतेत वाढ होणार आहे, हे खरं असलं तरी ए.आय. म्हणजे सगळंच काही ‘छान छान’ असं नाही. खुद्द हिंटन यांनाही याची कल्पना आहे. त्यांना आपण विकसित केलेल्या ए.आय.च्या संभाव्य दुष्परिणामांची कल्पना येऊ लागली होती. त्यामुळंच वाढत्या वयाचा आधार घेऊन, वयाच्या 75व्या वर्षी, ते गुगल बे्रन कंपनीतून बाहेर पडले. मात्र, त्यापूर्वी हिंटन यांनी ए.आय.च्या क्षेत्रामध्ये जे पायाभूत काम केलं, त्याला तोड नाही. त्यांना आणि जॉन हॉपफिल्ड यांना भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक जाहीर करताना नोबेल अॅकॅडमी म्हणते, ‘ए.आय.मुळं हवामानातील बदलांबाबतच्या प्रारूपांमध्ये (मॉडेल्स) सुधारणा करणं शक्य होईल. सौरविजेर्या विकसित करणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी माणसाच्या अवयवांच्या (हात, पाय, नाक वगैरे आणि शरीरांतर्गत अवयव) चित्रांचं विश्लेषण करणं ए.आय.मुळं सहजशक्य होणार आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रांत ए.आय.चा होणारा उपयोग माणसाच्या भल्यासाठीच असेल, यात शंका नाही.
मात्र, ए.आय.चा वापर एकंदर सर्व मानवजातीच्या हितासाठीच होईल का, अशी शंका या क्षेत्रातले अभ्यासक व्यक्त करतात. खुद्द जेफ्री हिंटन यांच्याही मनात अशा शंका आहेत. ए.आय. माणसाच्या मुळावरच उठण्याच्या भीतीचीसुद्धा त्यांना कल्पना आहे. यासंदर्भात हिंटन म्हणतात, ‘मी आजवर केलेल्या कामाबद्दल मला अजिबातच खंत वाटत नाही. मात्र, दीर्घकाळाचा विचार करता ए.आय. हा माणसाला सर्वार्थानं डोईजड होईल, अशी भीती वाटते.’ त्यांना सर्वात जास्त भीती वाटते, ती ए.आय.मधील ‘उत्क्रांती’ची! याचं कारण ही उत्क्रांती कशी होईल, याचा काहीही अंदाज करणं शक्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. कॉम्प्युटरवरच आधारित असलेली ए.आय. सिस्टीम (अल्गोरिदम, डेटा वगैरे) ही एका अर्थानं ‘अमर’ असल्यासारखी आहे. माणसाप्र्रमाणं तिला मर्यादित आयुष्य नाही. कॉम्प्युटर काम करेनासा झाला, तर त्या नादुरुस्त कॉम्प्युटरमधून ए.आय.ची सिस्टीम ही दुसर्या नवीन कॉम्प्युटरमध्ये साठवून सुरक्षितपणं ठेवता येते. याचा दुसरा अर्थ असा आहे, की ए.आय.ला स्वतःमध्ये सतत सुधारणा करत राहणं शक्य आहे. ए.आय.च्या एकापेक्षा अनेक प्रती असू शकतात. त्या जे काही नवीन शिकतात, ते आपल्यापुरतं न ठेवता इतरांना देऊ शकतात. याउलट माणसाचं आहे. त्याला आपल्याला नव्यानं मिळालेलं ज्ञान झटकन सर्व माणसांना देता येत नाही. ते अशक्यच आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर असं दिसतं की ए.आय. हा माणसापेक्षा जास्त चतुर आणि बुद्धिमान होऊ शकेल. याबाबतीत माणूस बेफिकीर राहिला, तर ते माणसाच्या अंगाशी येऊ शकेल, अशी भीतीही हिंटन व्यक्त करतात.
ए.आय. बेबंद किंवा बेभान होऊन माणसाला पूर्णपणेवरचढ ठरण्याची संभाव्यता नाकारता येत नाही. हे टाळायचा एक मार्ग म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणार्या जगभरातल्या सर्व संशोधकांनी जागतिक पातळीवर एकत्र आलं पाहिजे. एकमेकांबरोबर सहकार्य केलं पाहिजे. परस्परांशी बोलत राहिलं पाहिजे. ज्ञानाची आणि अनुभवांची देवाण-घेवाण होत राहिली पाहिजे. ए.आय.मुळं अनेकांचे रोजगार जाण्याची भीतीही फार मोठी आहे, असंसुद्धा हिंटन सांगतात. 200 वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जी अवस्था झाली होती, तशीच काहीशी ए.आय.मुळंही होण्याची संभाव्यता आहे. अनेकांच्या हातांना कामच मिळणार नाही. बौद्धिक क्षेत्रामध्ये काम करणार्यांच्यासुद्धा नोकर्यांवर गदा येण्याची भीती फार मोठी आहे. आताचा विचार केला तर सामान्य ज्ञानाच्या बाबत ‘जीपीटी-4’ आजच माणसाला मागं टाकू लागला आहे. तर्कशुद्ध विचार करण्याच्या बाबतीत आज ए.आय. माणसापेक्षा मागं आहे. आज तो साध्या तार्किक गोष्टी करू शकतो, पण ज्या गतीनं आता ए.आय.ची प्रगती होत आहे, ती ध्यानात घेतली, तर याबाबतीत ए.आय. माणसाला कधी मागं टाकेल, याचा अंदाज करणं कठीण आहे.
सगळ्यात मोठी भीती आहे, ती ए.आय.चा वापर कशासाठी केला जाईल याची! एखाद्या बेछूट, स्वार्थी, सत्तापिपासू माणसानं ए.आय.चा वापर आपल्या स्वार्थासाठी करायचा ठरवला, तर ते माणसाला फारच भारी पडू शकेल. याचं कारण ए.आय.मुळं यांत्रव (रोबोट) अधिक चतुर होतील. सर्वार्थानं शक्तिमान होतील. माणसाला डोईजड होऊ शकतील, हे आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. ए.आय.बाबत कमालीची सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, ती अशा विविध कारणांनी. खुद्द हिंटन यांनीसुद्धा त्याची गरज स्पष्टपणं सांगितली आहे. थोडक्यात काय, तर आपल्याला चकित करणारा ए.आय. भीतीदायकही आहे. मन मोहवून टाकणार्या गुलाबाला काटेही असतात, याचं भान कधीही सोडू नये, हेच खरं....!