

पुढारी ऑनलाईन डेस्क : एलन मस्कने xAI ने विकसित केलेल्या AI, ग्रोकसाठी अर्ली बीटा व्हॉइस फीचर लाँच करण्याची घोषणा केली आहे. ग्रोक अॅपद्वारे iOS वर उपलब्ध असलेले हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना व्हॉइस कमांडद्वारे AI शी संवाद साधण्याची आणि बोललेले प्रतिसाद ऐकण्याची परवानगी देते. हे अद्याप पूर्णपणे सार्वजनिक झालेले नाही. अद्याप अँड्रॉइड वापरकर्त्यांना भविष्यातील अपडेटची वाट पहावी लागणार आहे.
ग्रोक ३ च्या रोलआउटमध्ये व्हॉइस इंटिग्रेशन आणि डीपसर्चसारखी महत्त्वाची अपडेट्स समाविष्ट आहेत. या नव्या आवृत्तीत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, परंतु व्हॉइस फीचर त्याच्या परस्परसंवादी आणि व्यावहारिक उपयोगामुळे विशेष लक्ष वेधून घेत आहे. एलोन मस्क यांनी हे वैशिष्ट्य २०२४ च्या अखेरीस उपलब्ध होईल असे जाहीर केले होते. सध्या हे फीचर प्रीमियम+ एक्स वापरकर्ते किंवा सुपरग्रोक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तसेच, xAI भविष्यात हे वैशिष्ट्य सुधारण्यास आणि त्याची उपलब्धता वाढवण्यास प्रयत्नशील आहे.
सुरुवातीच्या बीटा टप्प्यात काही त्रुटी अनुभवास येऊ शकतात, जसे की अनपेक्षित वाक्यरचना. तरीही, वारंवार होणाऱ्या अपडेट्समुळे या बग्सचे जलद निराकरण केले जाणार आहे. व्हॉइस मोडचा उद्देश AI ला अधिक संवादात्मक आणि नैसर्गिक बनवणे हा आहे. पारंपरिक "टाईप आणि उत्तराची वाट पाहा" यापेक्षा हा अधिक संवादी आणि त्वरित प्रतिसाद देणारा अनुभव देतो. वापरकर्ते हे फीचर सक्षम करून, व्हॉइस निवडून चॅट सुरू करू शकतात.
DeepSeek-R1 आणि OpenAI च्या ChatGPT प्रमाणेच, ग्रोक ३ च्या होमपेजवर मध्यभागी इनपुट बार आहे. यामध्ये डावीकडे फाइल अटॅचमेंट, डीपसर्च आणि 'थिंक' पर्याय, तसेच उजवीकडे एआय मॉडेल निवड आणि एंटर बटण आहे. विशेष बाब म्हणजे, यात तर्कशक्तीला चालना देणारे मॉडेल अंतर्भूत आहे आणि वापरकर्ते सहजपणे मानक एआय मोड आणि "रीझनिंग मोड" यामध्ये स्विच करू शकतात.